Sussanne Khan on bonding with ex husband Hrithik Roshan’s family: हृतिक रोशन व सुझेन खान यांनी २०१४ मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतरही त्यांच्यात मैत्रीचे उत्तम नाते आहे. ते अनेकदा एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करतात. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुझेन खानने हृतिकच्या आईबरोबर, तसेच त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर कसे नाते आहे याबद्दल वक्तव्य केले आहे.
“त्याच्या आईबरोबरचं नातं आणखी…”
सुझेन खानने नुकतीच Honestly Why Not या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत ती म्हणाली, “गेल्या सहा महिन्यांत हृतिकच्या आई-वडिलांबरोबरचं नातं खूप छान झालं आहे. माझ्या आईला गमावल्यानंतर त्याच्या आईबरोबरचं नातं आणखी घट्ट झालं, असं मला वाटतं. आम्ही दोघी ज्या दु:खातून जात होतो, त्याची जाणीव मला झाली. कदाचित माझ्याकडून काही चुका झाल्या असतील. त्या माझ्यावर ज्या पद्धतीनं प्रेम करायच्या, त्याचा मी आता विचार करते. माझी आई गेल्यानंतर मला त्यांच्याबद्दल आणखी प्रेम वाटू लागलं आणि भूतकाळात त्या माझ्यासाठी किती महत्त्वाच्या होत्या, याचीही मला पुन्हा एकदा जाणीव झाली.”

पुढे ती म्हणाली, “त्या माझ्यावर माया करतात, प्रेम करतात. त्यांना माझा अभिमान वाटतो. माझ्या आईची कायम हीच इच्छा होती की, जे लोक माझ्यासाठी कायम उभे राहिले, त्यांच्यावर मीही प्रेम करावं. हृतिकच्या आई-वडिलांनी मला कठीण काळात कायम मदत केली आहे, हेही माझ्या आईला माहीत होतं. ती मला नेहमी म्हणायची की, तू त्यांच्याशी चांगलं वाग. पण, कामाच्या व्यापात आणि स्वत:कडे लक्ष देत असताना आपण या गोष्टी विसरतो.”
सुझेन असेही म्हणाली, “माझी आई गेल्यानंतर माझं व हृतिकच्या आई म्हणजेच पिंकी यांच्याशी नातं खास झालं आहे. मला ते आणखी घट्ट करायचं आहे. त्यांचे अर्सलानबरोबर (सुझेनचा बॉयफ्रेंड) आणि माझं सबाबरोबर (हृतिकची गर्लफ्रेंड) खूप प्रेमळ आणि जिव्हाळ्याचं नातं आहे. आता आम्ही एक आनंदी कुटुंब आहोत. आमच्यात कोणताही अहंकार नाही, उलट आम्ही मनापासून एकमेकांची काळजी घेतो. या सगळ्यांसाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते.”

दरम्यान, सुझेन व हृतिक रोशन यांनी २००० मध्ये लग्न केले होते. २०१३ मध्ये ते वेगळे झाले आणि २०१४ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांना दोन मुले आहेत.
