Swara Bhasker IVF Claim: बॉलीवूडची बिंधास्त अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या ‘राईज अँड फॉल २’ या रिॲलिटी शोमुळे प्रचंड चर्चेत आहे. या शोमध्ये स्वराने तिच्या आयुष्यातील अत्यंत खासगी गोष्टीचा खुलासा केला आहे. लग्न न करताच आई व्हायचं असल्याने तिने स्पर्म डोनरच्या मदतीने दोनदा आयव्हीएफ केले होते. “माझं लग्न होणार नाही असं वाटल्याने मी सिंगल मदर होण्याचा निर्णय घेतला होता,” असं स्वराने सांगितलं.
“मी विचार करत होते की माझं लग्न तर होणार नाहीये, त्यामुळे मी आयव्हीएफद्वारे बाळ जन्म द्यायचं ठरवलेलं. मी यासाठी माझ्या आई-वडिलांची मनधरणीही केली होती.” असं स्वराने सांगितलं. हे ऐकून तिचे आई-वडील फार खूश नव्हतेच. “हे सगळं काय आहे?” असं त्यांनी विचारलं होतं. मात्र नंतर ते तयार झाले. पण भारतात लग्न न करता आई होणं खूप आव्हानात्मक आहे, तरीही तुला करायचंच असेल तर तू कर असं त्यांनी स्वराला म्हटलं होतं.
२ आयव्हीएफ फेल झाले – स्वरा भास्कर
“मला एक बाळ हवं होतं. स्वतःचं कुटुंब हवं होतं. त्यासाठी मी दोनदा आयव्हीएफ केले. स्पर्म डोनर अनोळखी होता. पण आयव्हीएफ फेल झाले,” असं स्वरा भास्करने नमूद केलं. हे सगळं सुरू होतं, तेव्हा ती व फहाद फक्त मित्र होते. त्यानंतर दोघे डेट करू लागले. ३ महिने डेट केल्यानंतर ती गरोदर राहिली.
स्वरा म्हणाली, “आम्ही कोर्ट मॅरेज करत होतो, त्यादिवशीच आम्हाला ही गुड न्यूज समजली होती.”
स्वरा भास्कर व फहाद अहमदची लव्ह स्टोरी, लग्न
स्वरा आणि फहाद यांची पहिली भेट जानेवारी २०२० मध्ये झाली. सीएएविरोधात चाललेल्या एका आंदोलनादरम्यान दोघांची ओळख झाली होती. नंतर दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि त्यांची चांगली मैत्री झाली आणि ते प्रेमात पडले. स्वरा आणि फहाद यांनी ६ जानेवारी २०२३ रोजी विशेष विवाह कायद्यानुसार रजिस्टर मॅरेज केले. त्यानंतर १६ फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून आपल्या लग्नाची अधिकृत माहिती दिली. मार्च २०२३ मध्ये दिल्ली पारंपरिक पद्धतीने लग्न केले.
लग्नानंतर काहीच महिन्यांत, म्हणजेच जून २०२३ मध्ये स्वराने ती आई होणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर २३ सप्टेंबर २०२३ रोजी स्वराने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांनी आपल्या मुलीचे नाव ‘राबिया’ ठेवले. राबिया आता ३ वर्षांची आहे.
