Swara Bhasker Director Harassment Controversy: अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या ‘राइज अँड फॉल २’ या शोमध्ये दिसत आहे. तिने घरातील सदस्यांशी बोलताना करिअरच्या सुरुवातीचा एक वाईट प्रसंग सांगितला. ‘तनु वेड्स मनू’ चित्रपटाच्या यशानंतर एका दिग्दर्शकाने तिच्याशी गैरवर्तन केलं होतं. त्या दिग्दर्शकाने आधी तिच्या सौंदर्यावर कविता पाठवण्यास सुरुवात केली आणि नंतर एका रोमँटिक दृश्याची खासगीत रिहर्सल करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. दिग्दर्शक आणि कॅमेरामन दोघांनीही दारू प्यायलेली आहे हे लक्षात आल्यावर स्वरा प्रचंड घाबरली होती.
स्वरा भास्करने प्रियंका चहर चौधरी आणि तेज प्रताप यादव यांच्याशी बोलताना ही घटना सांगितली. ‘तनु वेड्स मनू’ हा चित्रपट रिलीज झाल्यावर हे घडलं होतं, असं तिने स्पष्ट केलं. प्रसंगाची आठवण सांगताना स्वरा म्हणाली, “‘तनु वेड्स मनू’नंतर लगेचच ही घटना घडली होती. हा माझा मुख्य अभिनेत्री म्हणून मोठा चित्रपट होता आणि आम्हाला ५६ दिवस शूटिंग करायचे होते. आधी तो मला म्हणाला की दिग्दर्शकांचं कलाकारांवर प्रेम असलं पाहिजे. त्यानंतर त्याने माझ्या सौंदर्यावर कविता पाठवायला सुरुवात केली. मी त्याकडे दुर्लक्ष केले.”
रोमँटिक सीनच्या रिहर्सलसाठी एकटीलाच बोलावलं
दिग्दर्शकाने नंतर बाकीच्या टीमला न बोलावता फक्त तिच्यासोबतच एका रोमँटिक सीनची रिहर्सल करायची आहे, असं सांगितलं. यामुळे अस्वस्थ झालेल्या स्वराने रिहर्सलसाठी अभिनेता आणि कॅमेरा टीम कुठे आहे असं विचारलं. स्वरा म्हणाली, “मी विचारलं, ‘रिहर्सलसाठी कोण कोण आहे?’ तर तो म्हणाला, ‘फक्त तू आणि मी, आपण चर्चा करू.’ त्यावर मी नकार दिला. ‘तुम्ही अभिनेत्याला आणि कॅमेरामनला बोलवा. रिहर्सल असेल तर सर्वजण असायला पाहिजे. फक्त आपणच का?'”
स्वराने सांगितलं की ज्या गेस्टहाऊसमध्ये ती राहत होती, तिथे ती एकमेव महिला होती. नंतर तिच्या लक्षात आलं की दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर दोघेही दारू पीत होते. यामुळे ती खूप अस्वस्थ झाली. “ते दोघेही दारू पीत होते आणि त्यांची बाटली अर्धी संपली होती. २०-२१ वर्षांच्या एका तरुण मुलीने दारू पिलेल्या दोन पुरुषांबरोबर रिहर्सल का करावी? मी खूप घाबरले होते, त्यामुळे मी लवकरात लवकर तिथून निघून गेले,” असं स्वराने सांगितलं.
रात्री दारूच्या नशेत त्याने खोलीचा दरवाजा ठोठावला- स्वरा भास्कर
स्वरा सेटवरून निघून गेल्यानंतरही हा प्रकार थांबला नाही. तो दिग्दर्शक रात्री दारूच्या नशेत तिच्या खोलीचा दरवाजा ठोठावू लागला. “हे सगळं तिथेच संपलं नाही. रात्री तो सतत माझा दरवाजा ठोठावत होता, मला वाटलं तो दरवाजा तोडेलच. मी दरवाजा उघडला, तेव्हा तो दारूच्या नशेत होता. त्याला नीट उभं राहताही येत नव्हतं आणि तो मला मिठी मारायची आहे असं म्हणत होता.”
स्वरा पुढे म्हणाली, “मी स्पष्ट नकार दिला की मी मिठी मारणार नाही. तो दारूच्या नशेत अडखळत बोलत राहिला आणि सतत दबाव टाकत होता. मी त्याच्या तोंडावरच सांगितलं की मला त्याची भीती वाटतेय, पण मी त्यापेक्षा जास्त काही करू शकत नव्हते, कारण तो त्या चित्रपटाचा दिग्दर्शक होता.” दरम्यान, हा प्रसंग सांगताना स्वराने त्या दिग्दर्शकाचे किंवा चित्रपटाचे नाव सांगितले नाही.
