गेल्या महिनाभरापासून कुस्तीपटू दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलन करत आहेत. रविवारी(२८ मे) पंतप्रधान मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं लोकार्पण झालं. त्याचदरम्यान आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी नव्या संसद भवनासमोर महापंचायत घेण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान, कुस्तीगीर आणि दिल्ली पोलिसांमध्ये झटापट झाली. दिल्ली पोलिसांनी साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनियासह अन्य कुस्तीपटूंना ताब्यात घेतलं. या संपूर्ण प्रकारानंतर आता कुस्तीपटूंनी त्यांनी देशासाठी मिळवलेली पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे.
बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक या तिघांनीही सोशल मीडियावर ट्वीट करत ही भूमिका मांडली आहे. कुस्तीपटूंनी पदकांबाबत घेतलेल्या निर्णायाबाबत बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने ट्वीट केलं आहे.
स्वराने साक्षी मलिकचं ट्वीट रिट्वीट केलं आहे. “आपलं सरकार एका बलात्काऱ्याला सरकार संरक्षण देत आहे, याची मला लाज वाटते. या लज्जास्पद भारतात आम्हाला फासावर लटकवा,” असं स्वराने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
कुस्तीपटूंनी ट्वीटमध्ये काय म्हटलं?
“आम्हाला मिळालेली पदकं आम्ही गंगेत विसर्जित करत आहोत. कारण ती गंगामाई आहे. आम्ही जेवढं पवित्र गंगामाईला मानतो तेवढीच मेहनत आम्ही हे पदकं मिळवण्यासाठी केली होती. आम्हाला आमची पदकं प्राणांहून जास्त प्रिय आहेत पण ती आता गंगेत विसर्जित करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरलेला नाही,” असं या कुस्तीगीरांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swara bhasker reacted after wrestlers decision to throw medals in ganga river sakshi malik kak