Swara Bhasker On body shaming: अभिनेत्री स्वरा भास्कर ही तिच्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. ती तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अनेक जण तिचे कौतुक करतात, तर अनेक जण तिच्यावर टीकाही करतात. आता स्वरा भास्करने असे काही केले आहे की, तिच्या कृतीची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे.
‘राईज अँड फॉल २’या शोची सुरुवात झाली आहे. शनिवारी या कार्यक्रमाचा प्रीमियर सोहळा पार पडला. वीरेंद्र सेहवाग या शोचे सूत्रसंचालन करीत आहेत. अभिनेत्री स्वरा भास्कर या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. यावेळी तिने तिच्या खास पद्धतीने तिला ट्रोल करणाऱ्यांना विशेषत: बॉडी शेमिंग करणाऱ्यांना स्वराने उत्तर दिले आहे.
वजनावरुन ट्रोल करणाऱ्यांना स्वरा भास्करचे सडेतोड उत्तर
स्वराने निळ्या रंगाची साडी नेसली होती. तिने तिच्या ब्लाऊजवर ठळक अक्षरात ‘मोटी’ हा शब्द लिहिल्याचे पाहायला मिळाले. जेव्हा वीरेंद्र सेहवाग यांनी त्यामागचे कारण विचारले. त्यावेळी ती म्हणाली की, मुलीच्या जन्मानंतर माझे वजन वाढले आहे. त्यानंतर मला वाढलेल्या वजनामुळे ट्रोल केले जाते.
ती असेही म्हणाली, “सोशल मीडियावर मला अनोळखी लोकांनी मला विविध नावं दिली आहेत. हत्ती, म्हैस, पाणघोडा, गाय अशा अनेक नावांनी मला बोलावलं जातं.”
स्वरा असेही म्हणाली, “मी जाड झाले, म्हैस झाले, गाय झाले. ठीक आहे, मी हे सगळं झाले आहे. आता मी सगळ्या शब्दांना स्वीकारते”, असे म्हणत वजनावरून ट्रोल करणाऱ्यांना स्वराने उत्तर दिले आहे. स्वराने याआधीही मुलाखती, सोशल मीडिया या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
दरम्यान, राईज अँड फॉल या शोचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्राईइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा शो प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तसेच, एमएक्स प्लेअरवरही पाहता येणार आहे. या शोचे नवीन भाग दररोज दुपारी १२ वाजता प्रसारित होतात. स्वरा भास्करव्यतिरिक्त या शोमध्ये करण पटेल, तेज प्रताप यादव, प्रियांका चहर चौधरी, गौतम गुलाटी, शहजाद पूनावाला, सिवेत तोमर, कियारा अनु, मनीष कश्यप, काजल राघवानी, निहारिका तिवारी, सारा गुरपाल, राज ग्रोव्हर, इरिना रुडाकोवा व अनिश भागा हेदेखील या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत.
