Swara Bhasker Clarification on Padmaavat Controversy: संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ चित्रपटातील ‘जौहर’च्या सीनवर केलेल्या वक्तव्यामुळे अभिनेत्री स्वरा भास्करवर चौफेर टीका होत आहे. या सर्व वादानंतर तिने एका व्हिडीओच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली असून, आपण राणी पद्मावती किंवा जौहर करणाऱ्या महिलांना कधीही ‘भ्याड’ म्हटलं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. दिल्लीतील ‘वुमन, लाइफ, फ्रीडम’ या कार्यक्रमातील स्वराच्या भाषणाची एक क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर टीका झाली. यावर उत्तर देताना मंगळवारी तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये तिने सांगितलं की, ‘पद्मावत’ पाहिल्यानंतर तिने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना ओपन लेटर का लिहिलं होतं, यावर ती बोलत होती. पण तिच्या विधानाचा विपर्यास करून तिचा चुकीचा अर्थ पसरवला जात आहे.
“आज सकाळी माझी एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ती कालच्या एका कार्यक्रमातील होती. त्या कार्यक्रमात मला विचारलं होतं की मी ‘पद्मावत’ पाहिल्यानंतर संजय लीला भन्साळी यांना ओपन लेटर का लिहिलं होतं? मी तो सीन पाहिल्यानंतर मला जे वाटलं ते मी बोलले, पण त्याचा आता पूर्णपणे चुकीचा अर्थ लावून खोटी माहिती पसरवली जातेय. मी राणी पद्मावती आणि जौहर करणाऱ्या इतर महिलांना भ्याड म्हटलं असा दावा केला जातोय,” असं स्वरा भास्करने सांगितलं.
स्वरा भास्करने दिलं स्पष्टीकरण
स्वरा भास्कर म्हणाली, “ज्या लोकांना माझ्यावर टीका करायची किंवा शिव्या द्यायच्या आहेत, त्यांनी त्या नक्की द्याव्यात. पण किमान योग्य कारणासाठी द्याव्यात. मी राणी पद्मावती किंवा राजवाड्यातील इतर महिलांना कधीही भ्याड म्हटलं नाही. त्या दृश्याबद्दल बोलताना मी फक्त एवढंच म्हणाले होते की, चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहताना माझ्या मनात हा विचार आला होता-देव न करो, पण जर मी स्वतः एखाद्या बलात्काराच्या प्रसंगातून वाचलेली स्त्री असते, तर अशा अत्याचारातून जिवंत राहिल्याबद्दल आणि स्वतःचा जीव न घेतल्याबद्दल मला मीच भ्याड वाटले असते.”
चित्रपटाच्या अशा क्लायमॅक्समधून समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो, या विचाराने आपण हे वक्तव्य केल्याचं तिने सांगितलं. देशातील लैंगिक हिंसाचाराच्या वास्तवाकडे लक्ष वेधत तिने एका सामूहिक बलात्काराच्या घटनेचा संदर्भ दिला आणि विचारलं की, “स्त्रीच्या जिवापेक्षा तिची पवित्रता जास्त मोलाची आहे, असा संदेश देणारे चित्रपट आपण बनवायला हवेत का? बलात्काराच्या घटनेतून जिवंत वाचलेल्या स्त्रीला तिने जगायला नको होते, असं भासवणं कितपत योग्य आहे?”
स्वरा भास्करचा व्हिडीओ
याच संदर्भात बोलताना स्वराने ‘निर्भया’ प्रकरणाचीही आठवण करून दिली. शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमांशी धैर्याने लढा देणाऱ्या त्या तरुण मुलीमध्ये जगण्याची तीव्र इच्छा होती, याची आठवण तिने करून दिली. तसेच कोणत्याही स्त्रीच्या जगण्याच्या जिद्दीला आणि इच्छेला कधीही कमी लेखले जाऊ नये, असं स्वरा म्हणाली.
दिल्लीतील कार्यक्रमात ‘जौहर’च्या सीनबद्दल स्वरा भास्करने काय म्हटलं होतं?
३१ ऑगस्ट रोजी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित ‘वुमन, लाइफ, फ्रीडम’ या कार्यक्रमात स्वराने ‘पद्मावत’ चित्रपटाच्या क्लायमॅक्सवर भाष्य केलं. शेकडो स्त्रियांना ‘जौहर’ करताना पाहून लैंगिक हिंसाचारातून वाचलेली एखादी स्त्री याचा काय अर्थ काढेल, असा विचार तिच्या मनात आला होता. “८०० स्त्रियांना जौहर करताना पाहून मला विचार आला की, देव ना करो, पण जर मी बलात्काराच्या प्रसंगातून वाचलेली स्त्री असते, तर या चित्रपटातून मला काय मेसेज मिळतोय? स्वतःचा सन्मान वाचवण्यासाठी मी जीव दिला नाही, म्हणून मला मी भ्याड वाटले असते. ज्या समाजात बलात्काराचे प्रमाण इतकं जास्त आहे, तिथे आपण अत्याचारातून वाचलेल्या महिलांना ‘तुमचं आयुष्य संपलंय आणि तुम्ही मेला असतात तर बरं झालं असतं असा मेसेज देणार का?” असं स्वरा भास्करने म्हटलं होतं.
“तो सीन पाहून मला खूप राग आला होता. भविष्यात मुस्लीम शासकाकडून बलात्कार होऊ नये म्हणून पोटातल्या स्त्रीभ्रूणालाही जन्म घेण्याचा अधिकार नाही, असं आपल्याला दाखवायचंय का?” असं स्वरा भास्कर म्हणाली होती.
