बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. येत्या २३ जूनला अभिनेत्री बॉयफ्रेंड झहीर इक्बालसह लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चा आहेत. सोनाक्षी आणि झहीर गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. लग्नाआधी अभिनेत्री झहीरच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवत असल्याचे फोटो आणि काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच आता सोनाक्षीच्या लग्नावर अभिनेत्री स्वरा भास्करने भाष्य केलं आहे.

स्वरा भास्करला आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. अभिनेत्रीच्या मते येत्या काळात सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांना सुद्धा या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागणार आहे. ‘कनेक्ट सिने’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत स्वराने आंतरधर्मीय जोडप्यांसाठी सोशल मीडियावर ट्रोल होणं ही किती सामान्य गोष्ट आहे हे सांगितलं. याचा अनुभव आपल्या लग्नावेळी आल्याचं स्वराने यावेळी सांगितलं.

हेही वाचा : “एक गोडुली पोरगी…”, श्रद्धा कपूरने केलं मराठी अभिनेत्रीचं कौतुक! कोण आहे ती?

स्वरा आपलं मत मांडताना म्हणाली, “आधुनिक भारतातील सर्वात मोठी कल्पित धारणा म्हणजे ‘लव्ह जिहाद’. यामध्ये एक हिंदू मुलगी मुस्लीम मुलाशी लग्न करते. ही गोष्ट मलाही लागू होते. काही शहरांमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आंतरधर्मीय जोडप्यांना मारहाण केली जाते. माझं लग्न झाल्यावर अनेक तज्ज्ञांनी आपली मतं मांडली होती. पण, खरंतर लग्न ही गोष्ट दोन व्यक्तींमध्ये होते.”

स्वरा पुढे म्हणाली, “दोन सुजाण व्यक्ती आपल्या वैयक्तिक आयुष्यात काय करतात? ते लग्न करतात करतात की नाही या सगळ्या गोष्टी त्यांच्या स्वत:वर अवलंबून असतात. एकत्र राहणं, कोर्टात लग्न करतात की निकाह? की ते दोघं आर्य समाजात लग्न करतात याबद्दल इतरांनी चौकशा करू नयेत. त्याचा इतरांशी कोणताही संबंध नाही. हा एक स्त्री-पुरुष आणि त्यांचं कुटुंब यांच्यातला वैयक्तिक विषय आहे. याचप्रमाणे हे पूर्णत: सोनाक्षीचं आयुष्य आहे. तिने आपला जोडीदार स्वत: निवडला आहे. त्यामुळे आता हे लग्न वगैरे हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. मी या चर्चांवर वेळ वाया घालवणार नाही.”

हेही वाचा : Video : नवरा हाच हवा! अक्षरा-अधिपतीचं वटपौर्णिमा विशेष गाणं पाहिलंत का? मास्तरीण बाईंनी केलाय झकास डान्स

“भारतात आणि काही दक्षिण आशियाई देशांमध्ये अशा गोष्टी सर्वाधिक घडतात. जिथे लोक इतरांच्या वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसतात. अजून काही वर्षे थांबा कारण, जेव्हा सोनाक्षी आणि झहीरला मुलं होतील तेव्हा त्यांच्या मुलांच्या नावांवरून वेगळी चर्चा सुरू होईल, करीना कपूर आणि सैफला मुलं झाली तेव्हा हेच झालं आणि मला बाळ झालं तेव्हा सुद्धा हेच सगळं पाहायला मिळालं. हा निव्वळ मूर्खपणा आहे आणि तो लवकर संपणार नाही.” असं मत स्वरा भास्करने व्यक्त केलं.