Taapsee Pannu on zero figure and flat midriff : सध्याच्या सोशल मीडियाच्या दुनियेत अभिनेत्रींचा फिटनेस आणि परफेक्ट फिगर याचे तरुणाईमध्ये प्रचंड आकर्षण आहे. झिरो फिगर बॉडी दिसावी यासाठी अनेक तरुणी जिम, जड वर्कआउट आणि डाएट फॉलो करताना दिसतात. मात्र, याचे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नूने याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. प्रत्येकाची शरीररचना वेगळी असते, त्यामुळे झिरो फिगरच्या मागे धावण्यापेक्षा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि निरोगी राहणे अधिक महत्त्वाचे असल्याचे तापसीने सांगितले आहे. तसेच हे फार उशिरा लक्षात आल्याने तापसीने तिच्या शरीराला खूप त्रास दिल्याचे नमूद केले आहे.
स्वतःला त्रास करून घेत ट्रॉर्चर केले – तापसी
अभिनेत्री तापसी पन्नूने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिने फिटनेस आणि वर्कआऊटबाबत मत व्यक्त केले. तसेच झिरो फिगर असे काही नसते, ओटीपोटावर थोडेफार फॅट्स असणे गरजेचे असल्याचे अधोरेखित केले आहे. फिटनेसबाबत तापसी पन्नू म्हणाली, “तरुण मुलींना झिरो फिगर मिळवण्याचे इतके वेड लागले आहे की, त्यासाठी त्या आरोग्याकडेही दुर्लक्ष करतात. कधीकाळी मलासुद्धा झिरो फिगर पाहिजे होती, पण मी लहानपणापासून खूप तंदुरुस्त होते. ओटीपोटावर चरबी होती आणि ती काही केल्या कमी होत नव्हती. ती घालवण्यासाठी मी खूप जास्त आणि जड वर्कआऊट करायचे; यामुळे मी अनेकदा स्वतःला त्रास करून घेत ट्रॉर्चर केले,” अशी कबुली तापसी पन्नूने दिली आहे.
फोटोसाठी स्वतःला अति व्यायाम करून त्रास देणं सोडा – तापसी
पुढे तापसी म्हणाली, “फोटोसाठी आणि सोशल मीडियासाठी लोकांना झिरो फिगर हवी असते, पण प्रत्यक्षात अशी ओटीपोटावर असलेली चरबी ही शरीरासाठी चांगली असते. ही चरबी फक्त फॅट नसून ती ‘वॉटर रिटेन्शन’ही असू शकते. तुम्ही चरबी कमी करण्यासाठी जेव्हा जास्त व्यायाम करता तेव्हा शरीरातील पाणी कमी होण्याऐवजी शरीर ते साठवून ठेवू लागते. जास्त वर्कआउटमुळे अशी चरबी आणखी वाढू शकते, त्यामुळे फोटोसाठी स्वतःला अति व्यायाम करून त्रास देणं सोडा. शरीर निरोगी आणि सुदृढ कसे राहील याकडे लक्ष द्या.”
प्रत्येक स्त्रीची फिगर झिरो फिगर असणं शक्य नाही – तापसी
तापसी पन्नूने खासकरून महिला आणि तरुणींना महत्त्वाचा व खास सल्ला दिला आहे. “प्रत्येक स्त्रीचे शरीर वेगळे असते आणि हार्मोनल बदलांमुळे शरीरात रोज वेगवेगळे बदल होत असतात, त्यामुळे रोज पोट एकसारखेच दिसेल असे नाही. महिलांना प्रजनन अवयव असल्यामुळे त्या भागात पाणी साठणे आणि त्याचे संरक्षण होणे गरजेचे असते, त्यामुळे प्रत्येक मुलगी दुसऱ्या मुलीसारखी दिसू शकत नाही. प्रत्येक स्त्रीची फिगर झिरो फिगर असणं शक्य नाही हे स्वीकारणे महत्त्वाचं आहे. हे सत्य आपल्याला खूप उशिरा समजल्याने आपण स्वतःच्या शरीराला अनावश्यक त्रास दिला,” अशी कबुलीही तापसी पन्नू हिने दिली.
अभिनेत्री तापसी पन्नू ही नुकतीच ‘अस्सी’ या चित्रपटामध्ये झळकली होती. कोर्टरुम ड्रामा असलेल्या या चित्रपटातील तापसीच्या भूमिकेचे कौतुक झाले. यानंतर लवकरच ती ‘गांधारी’ या चित्रपटामध्ये दिसणार असून हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
