पापाराझी हा अलीकडे बॉलीवूडमधील चर्चेचा विषय राहिला आहे. कलाकारांचे विमानतळावरील, पार्टीतील,कॅफेसह इतर विविध ठिकाणावरील फोटो व्हिडीओ पापाराझी काढत असतात आणि बहुतांशवेळा ते व्हायरल होतात. काही कलाकारांना हे आवडतं तर काहींना निर्थक वाटतं. त्यामुळे काही सेलिब्रिटी पापाराझींशी छान संवाद साधताना दिसतात तर काही मात्र खासगी आयुष्यातील क्षण टिपले गेल्याने नाराजी व्यक्त करतात. ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी तर एकदा स्पष्ट शब्दात पापाराझींना सुनावलं होत. परंतु, नंतर त्यांनी पापाराझींचा अपमान केला असं म्हणत अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली. अशातच आता त्यांच्याशी तापसी पन्नूशीची तुलना केली गेल्याने तिने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

जया बच्चन यांच्याप्रमाणे तापसी पन्नूचेही पापाराझींबरोबर अनकेदा खटके उडाले आहेत. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार यातील एक चर्चेचा प्रसंग २०२२मध्ये ‘दोबारा’च्या प्रमोशनदरम्यान घडला होता. तापसीला उशीर झाल्याची तक्रार पापाराझींनी केली होती. त्यावरून तिचा त्यांच्याशी वाद झाला. फोटोग्राफर उद्धटपणे बोलत होता आणि फोटो काढून माझ्यावर उपकार करत असल्यासारखं वागत होता, असं तापसीने त्याला सुनावलं होतं.

या घटनेनंतर तापसीवर काही पापाराझींनी टीका केली आणि ती उद्धटपणे वागते, असा आरोप केला. नंतर एका पापाराझीनेही सांगितलं होतं की, तिच्या वागण्यामुळे त्याच्या सहकाऱ्यांना तिचे फोटो काढायला फारसं आवडत नाही. पापाराझींबरोबरच्या तिच्या वारंवार होणाऱ्या वादांमुळे सोशल मीडियावर काही जण तापसीला दुसरी जया बच्चन किंवा जया बच्चन लाइट म्हणू लागले. जया बच्चन यांनीही अनेकदा पापाराझी आपल्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करत असल्याबद्दल त्यांना सुनावलं आहे.

त्या खूप चांगल्या अभिनेत्री आणि खंबीर व्यक्ती आहे – तापसी

न्यूज १८ला दिलेल्या मुलाखतीत तापसी म्हणाली, “मला वाटतं, ही माझ्यासाठी कौतुकाची गोष्ट आहे. मी नेहमीच या गोष्टीची सकारात्मक बाजू पाहते. त्या खूप चांगल्या अभिनेत्री आहेत आणि खंबीर व्यक्ती आहेत. माझी त्यांच्याशी तुलना केली जातेय, हे माझ्यासाठी खरंच कौतुक आहे.” मात्र, तापसीने स्वतःचा बचाव करताना स्पष्ट केलं की, तिने पापाराझींवर कधीही आवाज चढवलेला नाही. ती म्हणाली, “खरं सांगायचं तर मला याची फारशी पर्वा नाही. मला माहीत आहे की, मी कधीही कोणावर आवाज चढवलेला नाही. मी तसं करतच नाही.”

ती म्हणाली, “मी कोणालाही शिवीगाळ करत नाही. माझ्या मर्यादा अगदी स्पष्ट आहेत. आणि ज्या महिलेच्या मर्यादा स्पष्ट असतात, ती समोरच्याला दबावात आणू शकते. त्यांच्यासमोर काय योग्य आणि काय अयोग्य आहे, याबाबतही माझं मत स्पष्ट असतं आणि त्यांना ते आवडत नाही. मला थोडं अधिक मवाळ आणि जास्त नम्र असणं अपेक्षित असतं. खरं तर, तेच माझ्यावर ओरडतात आणि मला ते आवडत नाही.”

तापसी पुढे म्हणाली, “मी मोठी झाल्यापासून माझ्या आई-वडिलांशिवाय माझ्यावर कोणीही कधी ओरडलं नाही. पण हे लोक सतत तापसी! तापसी! तापसी! असं ओरडत राहतात. मी तुमच्या इतकी जवळ उभी आहे, मग ओरडण्याची काय गरज आहे? मीही त्यांच्याशी कधी अशा आवाजात बोलले नाही, खरं तर मला तसं बोलायला हवं होतं. तरीही त्यांना मला रागीट म्हणायचं ठरवलं, तर कदाचित त्यांना या शब्दाचा अर्थच माहीत नसावा.”