Taapsee Pannu on Marriage: अभिनेत्री तापसी पन्नू अनेकदा तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या स्पष्ट वक्तव्यांमुळे चर्चेत असते. तिने फक्त हिंदी सिनेमातच नाही, तर तमीळ व तेलुगू चित्रपटांतही काम केले आहे.
तापसी पन्नूने २०१३ मध्ये डेव्हिड धवन यांच्या चश्मे बहाद्दूर या सिनेमातून अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तापसी पन्नूला पिंक, थप्पड, सांड, मिशन मंगल, हसीन दिलरुबा, अॅनाबेल सेतुपती, तडका, शाबास मितू अशा अनेक चित्रपटांतून लोकप्रियता मिळाली.
लग्नाआधी तापसी पन्नूची काय अट होती?
अभिनेत्रीने २०२३ मध्ये लग्न केले. अभिनेत्रीने डेन्मार्कचा एक प्रसिद्ध माजी बॅडमिंटनपटू मॅथियस बो याच्याशी लग्नगाठ बांधली. त्याआधी ते दोघे रिलेशनशिपमध्ये होते. आता नुकत्याच एका मुलाखतीत तापसी पन्नूने लग्नाबाबत केलेले वक्तव्य चर्चेत आहे.
तापसी पन्नूने नुकतीच शुभंकर मिश्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, “तो मला नात्याचं ओझे कधीच जाणवू देत नाही. लग्नानंतरही माझ्या आयुष्यात फार बदल झाले नाहीत. माझं लग्न झालं आहे, हे मी जवळजवळ विसरून जाते. लग्नाआधी माझी हीच अट होती की, सगळं आधीसारखंच राहायला हवं.”
“कोणताही दबाव नसणं…”, तापसी पन्नू काय म्हणाली?
पुढे ती असेही म्हणाली, “आम्ही वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशातील आहोत. आमची पार्श्वभूमी वेगळी आहे; पण त्यापेक्षाही भावनिकरीत्या गोष्टी सहज असणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. कोणताही दबाव नसणं किंवा बंधन नसणं महत्त्वाचं आहे.”
तापसी असेही म्हणाली की, जेव्हा आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो, तेव्हा आम्ही आमच्या नात्याकडे अतिशय व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिले. जेव्हा आम्हाला वाटले की, आम्ही दीर्घकाळ एकमेकांबरोबर राहू शकतो, त्यावेळी आम्ही लग्नाचा निर्णय घेतला.
दरम्यान, तापसी पन्नूच्या थप्पड या सिनेमाची चांगलीच चर्चा झाली होती. तसेच, हसीन दिलरुबा या सिनेमाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. अभिनेत्री नुकतीच अस्सी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता आगामी काळात अभिनेत्री कोणत्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
