Taapsee Pannu on Marriage with Mathias Boe: अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाहीरपणे फार बोलत नाही. तापसीने डॅनिश बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक मॅथियास बो याच्याशी ३ वर्षांपूर्वी लग्न केलं. पण आतापर्यंत तिने तिच्या लग्नाचे फोटो किंवा फारसे तपशील शेअर केलेले नाहीत. आता आपल्या १३ वर्षांच्या या सुंदर प्रवासावर आणि नात्यातील विश्वासावर मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे.

तापसी व मॅथियासने लग्नाआधी एकमेकांना १० वर्षे डेट केलं होतं. नयनदीप रक्षितला दिलेल्या एका मुलाखतीत नात्यातील विश्वासाबद्दल तापसी म्हणाली, “ज्या वर्षी मी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं, त्याच वर्षी मी त्याला डेट करायला सुरुवात केली. इतक्या वर्षांपासून मी हे नातं जपून ठेवलं आहे, कारण मला वाटत नाही की मी यापेक्षा चांगला निर्णय घेऊ शकले असते. माझ्या आयुष्यात मी घेतलेला हा सर्वात चांगला निर्णय आहे. आपलं कुटुंब आपल्याला देव देतो. मी अभिनय क्षेत्रात आवडीपोटी आले नव्हते, सगळं योगायोगाने घडलं. त्यामुळे लग्न हा माझा स्वतःचा निर्णय होता आणि मला या निर्णयाचा खूप अभिमान आहे.”

तापसी व मॅथियास १३ वर्षांपासून एकत्र

नात्याचे मूळ कशात असावे, यावर प्रकाश टाकताना ती पुढे म्हणाली, “आम्ही १३ वर्षांपासून एकत्र आहोत. आम्हाला एकमेकांबरोबर आनंदी वाटतं. आमच्यात कोणतीही असुरक्षिततेची भावना नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एकमेकांबद्दल प्रचंड आदर आहे. प्रेम त्यानंतर येतं. जर नात्याचा पाया आदर नसेल, तर ते नातं फार काळ टिकू शकत नाही. चित्रपटसृष्टीत मी अनेक सहकलाकारांना पाहते जे खऱ्या प्रेमाच्या शोधात असतात, पण खरं प्रेम सापडणं कठीण आहे आणि दिवसेंदिवस आणखीच कठीण होत चाललंय. आपण तात्पुरत्या आनंदामागे तर धावत नाही ना? हे मला माहीत नाही, पण माझा अनुभव मात्र याच्या अगदी वेगळा आणि तितकाच सुंदर राहिला आहे.”

तापसी व मॅथियासची पहिली भेट

तापसी पन्नू आणि मॅथियास बो यांची पहिली भेट २०१३ मध्ये पार पडलेल्या ‘इंडियन बॅडमिंटन लीग’ दरम्यान झाली होती. या स्पर्धेच्या वेळी त्यांची ओळख झाली आणि त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या.त्यांनी दुबईत त्यांची पहिली डेट प्लॅन केली होती, नंतर ते डेट करू लागले.

दरम्यान, तापसी पन्नूचा ‘गांधारी’ चित्रपट नुकताच रिलीज झाला तिने चश्मे बद्दूर या सिनेमातून २०१३ साली बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिने तिच्या करिअरमध्ये पिंक, बेबी, नाम शबाना, थप्पड, मनमर्झिया, डंकी यासारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत.