आमिर खान दिग्दर्शित २००७ मध्ये रिलीज झालेल्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाची आजही चर्चा होत असते. या चित्रपटाने मुलांचे संगोपन, शिक्षण पद्धती आणि शिकण्यात अक्षम असलेल्या मुलांसमोरील आव्हानं यावर प्रकाश टाकला. या चित्रपटात दोन बालकलाकार होते, एक म्हणजे दर्शिल सफारी आणि दुसरा सचेत इंजिनिअर. दर्शिल अजूनही मनोरंजन क्षेत्रात आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतोय. तर सचेत मात्र चित्रपटाच्या यशानंतर बॉलीवूडपासून दूर गेला. ईशान अवस्थीचा लाडका मोठा भाऊ कुठे आहे आणि दोन दशकानंतर तो कसा दिसतो, ते जाणून घेऊयात.
‘योहान’ म्हणजेच सचेत आता आहे डेंटिस्ट
‘तारे जमीन पर’ चित्रपटात योहान अवस्थीची भूमिका साकारणाऱ्या सचेत इंजिनिअरने एका आदर्श मोठ्या भावाची भूमिका साकारली होती. इतर बालकलाकारांप्रमाणे याच क्षेत्रात कामासाठी धडपड न करता सचेतने शिक्षणाची वाट निवडली. त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्याने लंडनमधील नामांकित ‘UCL ईस्टमन डेंटल इन्स्टिट्यूट’मधून ‘पिरिओडोंटोलॉजी’ (Periodontology) मध्ये ‘M.Clin.Dent’ ही पदवी पूर्ण केली आहे आणि तो ‘युरोपियन फेडरेशन ऑफ पिरिओडोंटोलॉजी’चा (EFP) नोंदणीकृत सदस्य आहे. तसेच त्याने ‘ओव्हरसीज रजिस्ट्रेशन एक्झामिनेशन’चे (ORE) दोन्ही भाग क्लियर केले आहेत. आता त्याच्याकडे यूकेमध्ये डेंटिस्ट्री करण्याचा परवाना आहे.
सचेतने विदेशात जाण्यापूर्वी, त्याने डी. वाय. पाटील विद्यापीठातून पदवी घेतली आणि पिरिओडोंटोलॉजीमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. खरं तर सचेतची आवड फक्त डेंटिस्ट्री नाहीये.
पायलट होणार सचेत
सचेतचे इन्स्टाग्राम अकाउंट खासगी आहे. तरी त्याच्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. २०२४ मध्ये सचेतने विमानातील कॉकपिटमधील एक फोटो शेअर केला होता, त्यातून त्याला विमान उडवण्याची आवड दिसून येते. लवकरच तो पायलट होणार आहे.

सचेतची कौटुंबीक पार्श्वभूमी
एकेकाळी बालकलाकार म्हणून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सचेतचा डेंटिस्ट आणि पायलट होण्यापर्यंतचा प्रवास अनपेक्षित वाटू शकतो. पण, त्याला अभिनेता व्हायचं नव्हतंच. २०२२ मध्ये एका मुलाखतीत सचेतने म्हटलं होतं की, ‘तारे जमीन पर’ मधील भूमिका मिळणं हा फक्त एक योगायोग होता. “मी एका फिल्मी कुटुंबातून आलो आहे. माझी आजी कृष्णा कुमारी सेठ अभिनेत्री होत्या, तर आजोबा सूरज प्रकाश हे निर्माते होते. त्यामुळे मी नेहमीच इंडस्ट्रीशी जोडलेला होतो, तरीही मला या क्षेत्रात यायचं नव्हतं. खरं तर, चित्रपटाचे निर्माते माझ्या लहान भावाची ऑडिशन घेत होते. मी तिथेच उभा होतो आणि त्यांनी मला विचारलं, ‘तू सुद्धा ऑडिशन का देत नाहीस?’ मी ऑडिशन दिली आणि एका महिन्यानंतर मला फोन आला. त्यावेळी मी ११ वर्षांचा होतो,” असं सचेतने सांगितलं होतं.
सचेतने शिक्षणासाठी नाकारल्या चित्रपटांच्या ऑफर्स
हा चित्रपट हिट झाल्याने सचेत रातोरात लोकप्रिय झाला. नंतर त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या, पण त्याने त्या सर्व नाकारल्या. “लोक मला रस्त्यावर जाताना ओळखू लागले होते. मी फक्त त्यांच्याकडे पाहून हसायचो. आता मी बराच मोठा झालो आहे, तरीही लोक मला ओळखतात किंवा ‘तुला कुठेतरी पाहिलंय’ असं म्हणतात. या चित्रपटानंतर मी काही जाहिरातींमध्ये काम केलं. मला काही चित्रपटांच्या ऑफर्सही आल्या होत्या, पण शिक्षणापासून माझे लक्ष भरकटू नये म्हणून मी त्या स्वीकारल्या नाहीत,” असं सचेतने सांगितलं.
सचेतने म्हटलं होतं की त्याला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मनोरंजन क्षेत्रात परतायला आवडेल. मात्र, त्यानंतर चार वर्षे उलटून गेली तरीही त्याच्या कमबॅकबद्दल काही माहिती समोर आलेली नाही.
