why Tabu unmarried at 55: तब्बू ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आजवर विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामध्ये रोमँटिक ते गंभीर, विनोदी भूमिकांचाही समावेश आहे. तब्बूचा आज (४ नोव्हेंबर २०२६) ५५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊ…
तब्बूने १४ व्या वर्षी बॉलीवूडमध्ये पदार्पण
अभिनेत्रीचा जन्म ४ नोव्हेंबर १९७१ रोजी हैदराबादमध्ये झाला होता. तब्बूला तिच्या वडिलांचे प्रेम कधीच मिळाले नाही. तिच्याकडे त्यांच्या कोणत्याही आठवणी नाहीत. कारण- ती लहान असतानाच तिच्या वडिलांनी तिच्या आईला घटस्फोट दिला होता. तब्बू एका मुलाखतीत म्हणालेली, “मी तीन वर्षांची असताना वडिलांनी माझ्या आईला घटस्फोट दिला. आईने मला एकटीनेच वाढवले.” तब्बू तिच्या वडिलांचे आडनाव वापरत नाही आणि त्यामुळे तिला फक्त तब्बू म्हणूनच ओळखले जाते.
तब्बूची मोठी बहीण, फराह नाझ हीसुद्धा ८० व ९० च्या दशकातील एक लोकप्रिय अभिनेत्री होती. तब्बूने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बॉलीवूडमध्ये दिग्गज अभिनेते देव आनंद यांच्या चित्रपटातून केली. वयाच्या १२ व्या वर्षी तब्बू शिक्षणासाठी मुंबईला गेली आणि वयाच्या १४ व्या वर्षी तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.
तब्बूने बालकलाकार म्हणून १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम नौजवान’ या चित्रपटात काम केले होते. या सिनेमाआधी ती १९८२ च्या ‘बाजार’ चित्रपटातील ‘चले आओ सैयाँ’ या गाण्यात दिसली होती. तब्बूने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. २० व्या वर्षी ती ‘कुली नं. १’ या तेलुगू चित्रपटात दिसली. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला.
तब्बूला विजयपथ या सिनेमातून लोकप्रियता मिळाली. याच सिनेमामुळे तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. तीन दशकांच्या कारकिर्दीत तब्बूने ‘विजयपथ’ व ‘कुली नं. १’सोबतच ‘माचिस’, ‘मकबूल’, ‘हैदर’, ‘अस्तित्व’, ‘चांदनी बार’, ‘दृश्यम फ्रँचायझी’, ‘क्रू’, ‘भूल भुलैया २’, ‘दे दे प्यार दे’ व ‘हेराफेरी’ यांसारखे अनेक गाजलेल्या सिनेमांत प्रमुख भूमिकांत काम केले आहे.
तब्बूला दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मॅचस्टिक’ चित्रपटासाठी, तर दुसरा पुरस्कार २००१ ला प्रदर्शित झालेल्या ‘चांदनी बार’ चित्रपटासाठी मिळाला.
‘प्रेम’ चित्रपटाच्या वेळी तब्बूचे नाव अभिनेता संजय कपूरसोबत जोडले गेले होते; पण हे नाते फार काळ टिकले नाही. त्यानंतर तिचे नाव निर्माता साजिद नाडियाडवालाबरोबर जोडले गेले होते. तब्बू आणि तेलुगू सुपरस्टार नागार्जुन यांच्या नात्याची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. ‘निन्ने पेल्लाडाटा’ या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले होते. त्यावेळी ते एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र, नागार्जुन यांचे आधीच लग्न झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बू आणि नागार्जुन यांनी जवळपास १० वर्षे एकमेकांना डेट केले. २०१० च्या दशकाच्या सुरुवातीला ते वेगळे झाले.
