Tabu Baramati Marathi Video : बॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी संपूर्ण देशभरातले कलाकार मुंबईमध्ये येत असतात. कलाकारांची कर्मभूमी ही मुंबई आणि महाराष्ट्र असल्याने अनेक बॉलीवूड कलाकारांना अस्खलित मराठी भाषेमध्ये संवाद साधता येतो. त्यामध्ये विद्या बालन, काजोल आणि श्रद्धा कपूर अशा अनेक कलाकारांची नावे आवर्जून घेतली जातात. त्यामध्ये आणखी एका अभिनेत्रीचे नाव जोडले गेले आहे. लोकप्रिय अभिनेत्री तब्बूने बारामतीमध्ये एका कार्यक्रमामध्ये बारामतीकरांशी मराठी भाषेमध्ये संवाद साधला असून, तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अनेक दशके प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारी अभिनेत्री तब्बू ही प्रचंड लोकप्रिय आहे. तिच्या प्रभावी अभिनय आणि सौंदर्याद्वारे तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर आता तिने ओटीटीवरही स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तब्बू ही सिनेविश्वामध्ये सक्रिय असून तिच्या भूमिकांचे कौतुक केले जाते. नुकतीच ती एका दागिन्यांच्या दुकानाच्या उद्घाटनासाठी बारामती शहरामध्ये आली होती. यावेळी तिने शहराचे मराठीमध्ये कौतुक केले आहे.

‘तब्बू’ बारामतीमध्ये मराठीमध्ये चाहत्यांशी संवाद

तब्बू बारामतीमध्ये दाखल होताच तिचे चाहत्यांनी उत्साहाने स्वागत केले. यावेळी तिने गोल्डन रंगांचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. त्यासह गुलाबी रंगाची रेशमी ओढणी स्टाईल केली होती. त्यावर केसांची मराठी पद्धतीने आंबडा हेअरस्टाईल करीत केसांमध्ये गजरा माळला होता. त्याबरोबर नेकलेस आणि मोठे कानातले घालून तिचा लूक पूर्ण केला आहे. स्मोकी आइज मेकअप केल्याने तब्बूचे सौंदर्य आणखी खुलले होते. या ज्वेलरी दुकानाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत तिने चाहत्यांशी मराठीमध्ये संवाद साधला.

यावेळी तब्बूने ‘कसे आहात?’ अशी चाहत्यांची विचारपूस केली. त्यावर उपस्थितांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुढे तब्बू म्हणाली, “मी बारामतीमध्ये खूप लांबून प्रवास करून आले. तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी सकाळपासून मी प्रवास करीत होते. बारामती खूपच छान आहे; एकदम सुंदर आहे. एकदम सुंदर शहर बनवलं आहे,” तब्बूने बारामती शहराचे मराठीमध्ये कौतुक केले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी याचे श्रेय दिवंगत नेते अजित पवार यांना देत, त्यांची आठवण काढली आहे.

तब्बूने बारामतीचे कौतुक करताच नेटकऱ्यांनी दिवंगत अजित पवारांबाबत भावना व्यक्त केल्या आहेत. एकाने लिहिले, “बारामतीमध्ये अनेक चित्रपटांचे चित्रीकरण होताना दिसत आहे. ही बारामतीच्या विकासाची आणि निर्माण झालेल्या सक्षम पायाभूत सुविधांची साक्ष आहे. या बदलामागे अजितदादांनी केलेल्या कामाची खऱ्या अर्थाने ही पोचपावती म्हणावी लागेल, दादांच्या दूरदृष्टीला आणि विकासकामांना मनापासून सलाम! तुमची उणीव आजही प्रकर्षाने जाणवते,” आणखी एका नेटकऱ्यानं लिहिले, “जिथं दादांचं नेतृत्व आणि आमची स्वप्नं एकत्र येतात, ते शहर म्हणजेच बारामती.”

अभिनेत्री तब्बूच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तिचा ‘भूत बंगला’ हा हॉरर-कॉमेडी चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिने अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्यासह महत्त्वाची भूमिका साकारली होती. आता तब्बू लवकरच विजय सेतुपतीबरोबर ‘स्लमडॉग: ३३ टेंपल रोड’ या चित्रपटात झळकणार असून, तब्बल सहा वर्षांनंतर ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. त्याशिवाय तिचे ‘दृश्यम ३’ व ‘किंग 100’ हे चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.