Tahira Kashyap on Ayushmann Khurrana: आयुष्मान खुराना हा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आणि गायक म्हणून ओळखला जातो. त्याच्या प्रत्येक चित्रपटातील भूमिका वेगळ्या असतात, त्यामुळे त्याचा चाहतावर्ग मोठा आहे.
अनेकदा अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील मोठा चर्चेत असतो. आता त्याची पत्नी आणि निर्माती ताहिरा कश्यपने अभिनेत्याबद्दल एक वक्तव्य केले असून त्याची सध्या चर्चा होताना दिसत आहे.
ताहिरा कश्यप आयुष्मान खुरानाबद्दल काय म्हणाली?
ताहिरा कश्यपने नुकतीच ‘ऑफिशिअल पीपल ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल वक्तव्य केले. ताहिरा म्हणाली, “मी काही पैसे माझ्या लग्नात खर्च केले होते, पण माझ्याकडे बचत केलेले पैसे होते. त्यावेळी मी मुंबईत नोकरी करत नव्हते. आपला दैनंदिन खर्च कसा भागत आहे, याची आयुष्मानला जाणीवच नव्हती. घरात भाज्या, धान्य कोणत्या पैशातून येत आहे; माझा बँक बॅलेन्स कमी होत चालला होता.”
याविषयी अधिक बोलताना ताहिरा म्हणाली, “मी कधीही कोणाकडे पैसे मागितले नव्हते, अगदी माझ्या पालकांकडेही मागितले नाही. मी नेहमीच आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होते. पण, त्या वर्षभरात माझा बँक बॅलेन्स शून्य झाला.”
“एकदा मला आयुष्मानने तू आंबे का विकत आणले नाहीस असे विचारले. मला खूप राग आला, कारण त्याला आंबे खाता यावेत म्हणून दोन दिवसांपासून मी आंबे खात नव्हते, याकडे त्याचे लक्ष नव्हते. त्याने मला विचारले काय झाले? त्याने असे विचारताच मी रडायला लागले. मी त्याला विचारले की तुला काय वाटते, आपण घरातील साहित्य कसे विकत घेत आहोत? आता माझा बँक बॅलेन्स शून्य झाला आहे. सहा-सात महिने झाले, आपण फक्त मी बचत केलेले पैसे वापरत आहोत. मी जॉब शोधण्याचा प्रयत्न करत आहे.”
“माझ्या या बोलण्यानंतर आयुष्मानला परिस्थितीची जाणीव झाली. त्याने मला विचारले की, तू मला याबद्दल का सांगितलं नाहीस? माझ्याकडून आर्थिक मदत का घेतली नाही? त्यादरम्यान, आयुष्मान रेडिओमध्ये व्हिजे म्हणून काम करू लागला होता, त्याच्या करिअरची सुरुवात झाली होती.”
दरम्यान, ताहिरा व आयुष्मान हे शाळेत असल्यापासून एकत्र आहेत. अनेक वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी २००८ ला लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुले आहेत. ताहिरा अनेकदा तिच्या आरोग्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच तिने तिला पुन्हा कर्करोग झाल्याचे सोशल मीडियावर सांगितले होते.