Tamannaah Bhatia Kajra Re Dance Video : बॉलीवूड कलाविश्वात महत्त्वाचा समजला जाणारा ‘झी सिने अवॉर्ड्स’ सोहळा १७ मे रोजी मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाला यंदा कार्तिक आर्यन, अनन्या पांडे, रश्मिका मंदाना, शर्वरी वाघ, क्रिती सेनॉन, तमन्ना भाटिया, राशा थडानी अशा अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. याशिवाय यंदा या सोहळ्यात काही सेलिब्रिटींनी सुपरहिट बॉलीवूड गाण्यांवर परफॉर्मन्स देखील सादर केले. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
लोकप्रिय अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या हटके नृत्यशैलीमुळे कायमच चर्चेत असते. तिचं ‘स्त्री २’ सिनेमातील ‘आज की रात’ हे गाणं सर्वत्र तुफान व्हायरल झालं होतं. ‘झी सिने अवॉर्ड्स’मध्ये देखील तमन्नाने सुपरहिट बॉलीवूड गाण्यांवर जबरदस्त परफॉर्मन्स सादर केला आहे. करिना कपूर, कतरिना कैफ, ऐश्वर्या राय बच्चन या सगळ्या अभिनेत्रींच्या गाजलेल्या गाण्यांवर तमन्नाने डान्स केला.
सध्या तमन्ना भाटियाचा ‘कजरा रे…’ गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘विरल भय्यानी’ या पापाराझी पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात तमन्ना ऐश्वर्या रायच्या आयकॉनिक गाण्यावर थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे.
परफॉर्मन्स सादर करताना तमन्नाची एनर्जी, तिचे कमाल एक्स्प्रेशन्स या सगळ्या गोष्टींनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. “कजरा रे’ गाण्यावर ऐश्वर्यानेच बेस्ट डान्स केला आहे, तिला कोणाचीच तोड नाही पण, तमन्ना सुद्धा खरंच खूप सुंदर नाचलीये”, “तमन्नाचे एक्स्प्रेशन्स कमाल आहेत” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.
दरम्यान, ‘कजरा रे’ हे गाणं २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बंटी और बबली’ या चित्रपटातील आहे. या गाण्यात ऐश्वर्यासह तिचे सासरे अमिताभ बच्चन व पती अभिषेक बच्चन हे दोघंही एकत्र थिरकले आहेत. हे गाणं अलिशा चिनाई, शंकर महादेवन, जावेद अली यांनी गायलं असून, शंकर-एहसान-लॉय यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. आज २० वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता घराघरांत कायम आहे.