अभिनय विश्वात यशाच्या शिखरावर असलेल्या अभिनेत्री तमन्ना भाटियाने नुकताच एका मुलाखतीत समाजातील पुरुषप्रधान मानसिकतेचा वाईट अनुभव सांगितला. महिलांच्या बाबतीत आपल्या करिअरची निवड करताना, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा समाजाच्या अपेक्षांना जास्त महत्त्व दिलं जातं. अभिनेत्री तमन्ना भाटियाने नुकतीच एक अशी घटना सांगितली, जी समाजात महिलांच्या बाबतीत खोलवर रुजलेला हा पूर्वग्रह अधोरेखित करते.

३६ वर्षीय तमन्नाने पत्रकार श्रवण शाहशी संवाद साधताना एका प्रसंगाची आठवण करून दिली. “तो अनुभव खूपच विचित्र होता. मी माझ्या वडिलांबरोबर एका हॉटेलमध्ये दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर मीटिंग करत बसले होते. त्यावेळी त्या हॉटेलच्या मालकाची पत्नी माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, ‘तू किती चांगली सिंधी मुलगी आहेस, मग तू हे (अभिनय) का करतेस? आतापर्यंत तर तुझं लग्न व्हायला हवं होतं.’”

तमन्ना पुढे म्हणाली, “ही गोष्ट ती मला प्रत्यक्ष तोंडावर म्हणाली होती. हे खूप विचित्र होतं कारण मी तिथे तिला भेटायला गेले नव्हते, माझी मीटिंग दुसऱ्या कोणाशी तरी सुरू होती. पण तरीही ती स्वतःहून माझ्याकडे येऊन, जुजबी गप्पा मारून हे अतिशय टोकाचं मत माझ्यावर लादलं.”

एक तरुण महिला म्हणून या घटनेचा आपल्यावर काय परिणाम झाला, याबद्दल सांगताना तमन्ना म्हणाली, “मी जेव्हा त्या महिलेच्या चेहऱ्याकडे पाहिलं, तेव्हा मला जाणवलं की, मला तिच्यासारखं बनायचं नाहीये. जगातील स्त्रिया कोणत्या संघर्षातून जात आहेत, याबद्दल त्या स्त्रीला काहीच कल्पना नव्हती. अशा काही घटना तुम्हाला आयुष्यात विचार करायला भाग पाडतात.”

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांनाच लग्नासाठी एवढ्या दबावाचा सामना का करावा लागतो?

यासंदर्भात मानसोपचारतज्ज्ञ आणि कोच गुरलीन बरुआ यांनी काही गोष्टी सांगितल्या. अनेक समाजांमध्ये आजही स्त्रियांना केवळ कुटुंबाची काळजी घेणारी आणि मुलांना वाढवणारी व्यक्ती म्हणूनच पाहिले जाते. समाजात स्त्रियांचे मूल्य हे त्यांचे तारुण्य, प्रजनन क्षमता आणि लग्नासाठीचे योग्य वय यावर ठरवले गेले. याउलट पुरुषांचे मूल्य हे त्यांच्या कामावर आणि सामाजिक स्थानावर अवलंबून असते. ही जुनी मानसिकता आजही लोकांच्या वागण्यातून दिसून येते.

गुरलीन पुढे म्हणाल्या की, स्त्रियांनी ठराविक वयातच लग्न का केले पाहिजे, हे पटवून देण्यासाठी नेहमी ‘बायोलॉजिकल क्लॉक’ सारख्या संकल्पनांचा वापर केला जातो. मात्र, पुरुषांना अशा प्रकारच्या कोणत्याही गाष्टींचा सामना करावा लागत नाही. परिणामी, यशस्वी करिअर असलेल्या स्त्रियांना त्यांच्या कर्तृत्वावरून नाही, तर त्यांनी समाजाने ठरवून दिलेल्या वेळेत लग्न केलं आहे की नाही, यावरून पारखलं जातं.

अशा कमेंट्सचा महिलांच्या आत्मविश्वासावर होणारा परिणाम

अशा प्रकारच्या कमेंट्समुळे एखाद्या तरुण स्त्रीचा आत्मविश्वास कसा डळमळीत होऊ शकतो?

जेव्हा एखादी व्यक्ती, मग ती अनोळखी का असेना, कोणत्याही स्त्रीच्या लग्नाच्या योजनांवर कमेंट करते तेव्हा ती टिप्पणी खूप वैयक्तिक वाटते. याबद्दल गुरलीन म्हणाल्या, “हा प्रश्न फक्त लग्नाचा नसतो; तर तुमच्या निवडी किंवा तुमची प्राथमिकता कुठेतरी चुकीची आहे, असं तुम्हाला सतत सांगितलं जात असतं. अशा कमेंट्समुळे स्वतःबद्दलचा दृष्टिकोन बदलू शकतो. तुम्ही तुमच्या करिअरबद्दल कितीही ठाम असलात, तरी पुन्हा पुन्हा अशा गोष्टी ऐकल्यामुळे तुम्ही स्वतःच्या निर्णयांवर शंका घेऊ शकता किंवा आपण मागे पडतोय की काय, असं तुम्हाला वाटू शकतं.”

अशा गोष्टींना सामोरं कसं जायचं?

अशा कमेंट्सना सामोरं जायची कोणतीही एक ठराविक पद्धत नाही. तसेच त्या कमेंट्स न दुखावल्याचं भासवणंही चुकीचं आहे. अशा कमेंट्समुळे अस्वस्थ वाटणं, राग येणं किंवा धक्का बसणं हे स्वाभाविक आहे.

  • अशा कमेंट्सकडे लगेच दुर्लक्ष करण्यापेक्षा, त्या क्षणी तुम्हाला काय वाटतं हे समजून घ्या.
  • ती कमेंट समोरच्या व्यक्तीचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दर्शवते, तुमची किंमत ठरवत नाही, हे स्वतःला सांगा.
  • तुमच्या निवडीचा आदर करणाऱ्या मित्र-मैत्रिणींच्या आणि मार्गदर्शकांच्या सहवासात राहा. यामुळे तुमचा आत्मविश्वास परत मिळवण्यास मदत होते.
  • स्वतःची ओळख आणि समाजाच्या अपेक्षा यातील गुंता सोडवण्यासाठी थेरपी किंवा तज्ज्ञांची मदत घेणे देखील फायदेशीर ठरू शकते.