तमन्ना भाटियाने आतापर्यंत बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्री दोन्हीकडे अनेक चित्रपटांत काम केलं आहे. तिने अनेक हिट चित्रपट आणि गाणी दिली आहेत. अशातच आता जवळपास २० वर्षे इंडस्ट्रीत काम केल्यानंतर तिने तिचे चांगले वाईट अनुभव सांगितले आहेत. यावेळी तिने महिला कलाकारांना मिळणारी वागणूक, यश याबद्दल सांगितलं आहे.
बॉलिवूड आणि दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींकडे कसं पाहिलं जातं, याबद्दल बोलताना तमन्ना भाटियाने सांगितलं की, संगीत हा भारतीय चित्रपटसृष्टीचा नेहमीच एक महत्त्वाचा भाग राहिला आहे आणि आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच तिला त्याचं महत्त्व समजलं होतं. तमन्ना म्हणाली, “हिंदी चित्रपटसृष्टीत साधारणपणे दोन प्रकारचे कलाकार असतात. काही कलाकार अभिनयाकडे अधिक कलात्मक दृष्टिकोनातून पाहतात, त्यामुळे ते विशिष्ट प्रकारच्या भूमिका साकारण्यासाठी अधिक योग्य ठरतात. ते नेहमीच ग्लॅमरस गाणी किंवा तशा धाटणीच्या कलाकृतींमध्ये काम करतीलच असं नाही. हिंदी चित्रपटसृष्टी तुम्हाला या दोन्ही प्रकारच्या कामांची संधी देते आणि जे कलाकार अभिनयाबरोबर ग्लॅमरस गाणी, नृत्य याचंही प्रभावीपणे सादरीकरण करतात, तेच बहुतेक वेळा सुपरस्टार बनतात.”
दाक्षिणात्य इंडस्ट्रीत पितृसत्ताक विचारसरणी – तमन्ना
ती पुढे सांगितलं की, जेव्हा तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं, तेव्हा लोक या चित्रपटसृष्टीबद्दल विशिष्ट पद्धतीने का बोलतात किंवा तसं वर्णन का करतात, हे तिला हळूहळू समजू लागलं. तमन्ना पुढे म्हणाली, “तिथ पितृसत्ताक विचारसरणीची झलक दिसते किंवा असा एक दृष्टीकोन असतो जो फारसा कौतुकास्पद वाटत नाही. मात्र, मी चित्रपटांमधील संगीत आणि नृत्याच महत्त्व समजून घेतलं होतं. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अशा प्रकारच्या सादरीकरणासाठी विशिष्ट स्टारडम आणि स्क्रीन प्रेझेन्सची गरज असते. त्यामुळे माझ्या मते, व्यावसायिक सिनेमाच्या दृष्टीने पाहिल्यास ही चित्रपटसृष्टी तितकीच, किंबहुना त्याहून अधिक मर्यादित ठरू शकते. मी विशेषतः कमर्शियल सिनेमात यशस्वी होण्याच्या संदर्भात हे सांगत आहे.”
तमन्नाने पुढे हा फक्त तिचा अनुभव असून या इंडस्ट्रीतील इतरांचा अनुभव वेगळा असू शकतो आणि इंडस्ट्रीत अशाही अभिनेत्री आहेत ज्या १०-१५ वर्षे सलग काम करत आहेत आणि त्या यशस्वी आहेत. यावेळी तिने इतकी वर्षे काम करणाऱ्या बहुतांश अभिनेत्रींनी दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधलेला असतो. असं सांगितलं आहे
तमन्ना भाटिया येत्या काळात तिच्या आगामी Vvan: Force of the Forest या चित्रपटातून झळकणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन दिपक मिश्रा यांनी केलं असून, निर्मिती शोभा कपूर, एकता कपूर यांनी केली आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, तमन्ना भाटिया मुख्य भूमिकांमध्ये झळकणार आहेत. त्यांच्याबरोबर मनीष पौल, सुनील ग्रोवर, श्वेता तिवारी, अनुप सोनी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. २६ ऑग्स्ट रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.
