Tanisha Mukerji Viral Post on Women: बॉलीवूड अभिनेत्री काजोलची बहीण आणि ‘बिग बॉस’ फेम तनिषा मुखर्जी तिच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. विवाहित पुरुषांशी संबंध ठेवणाऱ्या महिलांवर भाष्य करत तनिषाने त्यांना थेट ‘स्त्रीविरोधी’ आणि ‘वाईट’ म्हटलं आहे. दुसऱ्याच्या पतीसोबत अफेअर करणं म्हणजे त्याच्या पत्नीचा अपमान करणं आहे, असं मत तिने मांडलंय. तनिषाच्या या रोखठोक मतावर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पोस्टमध्ये तनिषाने लिहिले, “माझे विचार- विवाहित पुरुषांशी अफेअर करणाऱ्या महिला फेमिनिस्ट नसतात. उलट त्या महिलांच्या विरोधात असतात. कारण दुसऱ्याच्या पतीसोबत राहणं म्हणजे त्याच्या पत्नीचा अपमान करणं आहे. अर्थात यामध्ये त्या पुरुषाचीही चूक आहे. तो प्रामाणिक नाही. पण ज्या महिला विवाहित पुरुषांच्या मागे लागतात त्या वाईट असतात. अशा महिला आपल्या मुलांसाठी आदर्श असूच शकत नाहीत. मला जे वाटलं ते मी बोलले आहे.”

तनिषा मुखर्जीची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्सनी तनिषाचं म्हणणं पटलंय. एका युजरने लिहिलं, “अगदी बरोबर, दोघेही तितकेच जबाबदार आहेत.” दुसऱ्या एका युजरने, “खरंय. जे कोणी जाणीवपूर्वक दुसऱ्याचा संसार मोडतं, त्याचं सत्य समोर यायलाच हवं, मग तो पुरुष असो वा स्त्री.”

tanisha-mukerji-viral-post-married-men-affairs
तनिषा मुखर्जीची पोस्ट (सौजन्य – एक्स प्लॅटफॉर्म)

गुन्हेगारी हा लोकसंख्या वाढीचा परिणाम- तनिषा मुखर्जी

तनिषाने गेल्या वर्षी ‘मेल फेमिनिस्ट पॉडकास्ट’मध्ये स्त्रीवादावर मत मांडलं होतं. भारतामध्ये महिलांचा आदर करण्याची मोठी परंपरा असल्याचं तिने म्हटलं होतं. “होय, आपल्या समाजात काही समस्या नक्कीच आहेत, पण त्याचा अर्थ असा नाही की आपल्या संस्कृतीत महिलांना आदर नाही. हिंदू धर्मात महिलांचा आदर केला जातो. पण ब्रिटिशांमुळे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे आपली संस्कृती आणि समाज बिघडला आहे. गुन्हेगारी लोकसंख्या वाढीचा परिणाम आहे. भगवान श्रीकृष्णाने कधीही राधेचा अनादर केला नाही आणि भगवान शिवाने कधीही माता पार्वतीचा अनादर केला नाही. त्यामुळे महिलांचा अनादर करणं हे आपल्या संस्कृतीत नाही. आपला देश हा महिलांना स्वातंत्र्य आणि ताकद देणारा देश आहे,” असं तनिषा मुखर्जी म्हणाली होती.

तनिषा मुखर्जीचे चित्रपट

तनिषा मुखर्जीने २००३ मध्ये बॉलवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण तिचा पदार्पणाचा Sssshhh चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळला होता. त्यानंतर तिने सरकार, निल अँड निक्की, उन्नाले उन्नाले हे चित्रपट केले. ती बिग बॉस ७ मध्ये सहभागी झाली होती. या शोमध्ये ती अरमान कोहलीच्या प्रेमात पडली होती. दोघांच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती. दोघेही लग्न करतील अशा चर्चा होत होत्या, पण त्यांचं ब्रेकअप झालं. तनिषा शेवटची २०२४ मध्ये आलेल्या लव्ह यू शंकर सिनेमात दिसली होती.