चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६ मध्ये ‘सैयारा’ चित्रपटाच्या टायटल ट्रॅकसाठी सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार संगीतकार तनिष्क बागचीने स्वीकारला. यावेळी तनिष्कने आपल्या आयुष्यातील एका कठीण प्रसंगाबद्दल सांगितलं. तनिष्कने दिग्दर्शक मोहित सुरी यांचे आभार मानले. तसेच नैराश्यातून बाहेर पडण्यास आणि जीवनाचा उद्देश पुन्हा शोधण्यास मोहित सुरी यांनी त्याला मदत केली. २०२५ मधील अत्यंत गाजलेल्या गाण्यांपैकी एक असलेल्या ‘सैयारा’साठी तनिष्क बागची, फहीम अब्दुल्ला आणि अर्सलान निझामी यांना हा पुरस्कार मिळाला.

पुरस्कार स्वीकारताना तनिष्क म्हणाला, “आज मला खूप दडपण आलं आहे. मला फक्त मोहित सुरी सरांचे आभार मानायचे आहेत. मी गेली दोन वर्षे नैराश्यात होतो. असं होतं कधी कधी, मी एक संगीतकार असल्याने थोडा भावूक आहे. या प्रवासात मी खूप अडखळलो आणि संघर्ष केला. मी अजिबात काम करू शकत नव्हतो.”

आयुष्यातील महत्त्वाच्या वळणाबद्दल तनिष्कने सांगितलं. त्याने नैराश्यात असताना मोहित सुरी यांच्याशी संपर्क साधला होता. “मी मध्यरात्री मोहित सरांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की, सर तुमच्याकडे अशी एखादी कथा आहे का, जिचा शेवट चांगला असेल? कारण जेव्हा तुम्ही कोणावर तरी मनापासून प्रेम करता आणि ती व्यक्ती तुमच्यापासून दुरावते, तेव्हा तुम्ही आशा सोडून देता.”

“मोहित सर माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं, ‘तनिष्क, तुझे आयुष्य संगीतासाठीच आहे आणि त्यामुळे तुझं पहिलं आणि शेवटचं प्रेम हे संगीतच असलं पाहिजे.’ मी त्यांचा हा सल्ला मानला आणि आम्ही ‘सैयारा’ची निर्मिती केली. त्यासाठी सर, तुमचे मनापासून आभार,” असं तनिष्क बागची म्हणाला.

“मी माझा सह-संगीतकार फहीम अब्दुल्ला (जो आजारी असल्यामुळे येथे येऊ शकला नाही) आणि अर्सलान यांचे आभार मानतो. त्यांच्याशिवाय हे गाणे तयार करणे मला शक्य झाले नसते,” असं तनिष्क बागचीने म्हटलं.

या त्रिकुटाने एका कठीण स्पर्धेत तगड्या स्पर्धकांना मागे टाकत ‘सर्वोत्कृष्ट गाणे’ हा मान मिळवला. या श्रेणीतील नामांकनांमध्ये आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’चे शीर्षक गीत आणि शाश्वत सचदेव यांनी संगीतबद्ध केलेले “गेहरा हुआ” यांचा समावेश होता. तसेच ‘सैयारा’मधीलच द रिश यांनी संगीतबद्ध केलेले “बरबाद” आणि सचेत-परंपरा यांनी संगीतबद्ध केलेले “हमसफर” ही गाणी देखील या शर्यतीत होती.