Tanushree Dutta On Nana Patekar Death Statement: अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने उज्जैनच्या महाकाल मंदिरातील एक व्हिडीओ शेअर करत मोठी पोस्ट लिहिली आहे. “नाना आणि त्यांच्या मित्रांनी माझ्यावर केलेल्या शेकडो मारण क्रियांपासून महाकाल बाबांनी माझे रक्षण केले आहे,” असं तनुश्री म्हणाली. नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी खरी असावी अशी इच्छा व्यक्त करत तिने, “माझ्या आयुष्यातील प्रत्येक दृष्ट व्यक्तीचा आणि त्यांना साथ देणाऱ्यांचा नाश व्हावा,” अशी प्रार्थना केली.
महाकाल मंदिरात प्रार्थना करतानाचा एक व्हिडीओ शेअर करत तनुश्रीने लिहिलं, “माझ्या आयुष्यात इतकी सकारात्मक गोष्ट घडल्यानंतर महाकालच्या दर्शनाचा योग आला. हा किती मोठा योगायोग आहे. जरी निधनाच्या बातमीच्या खरेपणाबद्दल माझ्या मनात गंभीर शंका असल्या, तरी वाईट शक्तींचा कायमचा अंत व्हावा आणि माझ्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी एकामागून एक नष्ट व्हाव्यात, अशी माझी मनापासून इच्छा आणि प्रार्थना आहे.”
मला त्रास देणाऱ्या प्रत्येकाचा नाश करा – तनुश्री दत्ता
तनुश्रीने पुढे लिहिलं, “माझी मनापासून महाकाल बाबांना इतकीच प्रार्थना आहे. मी त्यांच्याकडे आतापर्यंत काहीच नाही मागितलं त्यांची भक्ती आणि त्यांचे आशीर्वाद इतकंच माझ्यासाठी पुरेसं होतं. पण आज मी माझ्या सर्व देवी-देवतांकडे काहीतरी मागत आहे. जर तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर तुम्ही माझ्या आयुष्यातील प्रत्येक दृष्ट व्यक्तीचा नाश करा ज्यांनी मला त्रास दिला. कारण ते मरत नाहीत तोवर मला त्रास देणं थांबवणार नाहीत. फक्त त्यांचाच नाही तर त्यांना मदत करणाऱ्यांचा, त्यांची साथ देणाऱ्या दृष्टांचाही नाश करा.”
सतत होत असलेल्या त्रासाबद्दल संताप व्यक्त करत तनुश्री म्हणाली, “जर हे लोक अजूनही जिवंत असतील, तर मी व्यवस्थित जगू शकणार नाही आणि माझं कामही नीट करू शकणार नाही. मला त्या सर्वांचा नाश झालेला पाहायचा आहे. त्या सर्वांचा मृत्यू झालाय याची खात्री मला हवी आहे. मी आता इतकी नकारात्मकता आणि त्यांची सततची कटकारस्थाने सहन करू शकत नाही.”
शेवटी तनुश्री म्हणाली, “माझी वेळ आली आहे आणि जोपर्यंत माझी ही इच्छा पूर्ण होत नाही, तोपर्यंत मी पृथ्वीवर राहू शकणार नाही. बाबा, या पृथ्वीवर एकतर ते राहतील किंवा मी राहीन. खरं तर, वर मी तुमच्याशी अधिक चांगल्या प्रकारे जोडली जाऊ शकेन. ही पृथ्वी ओव्हररेटेड आहे आणि इथे जगण्याचे माझ्याकडे कोणतेही कारण उरलेले नाही. हर हर महादेव! तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता, हे तुम्ही जगाला दाखवून दिलं पाहिजे. मी तुमची भक्त आहे, त्या अधिकाराने मी आता तुमच्याकडे ही मागणी करत आहे. ते मला ओळखत नाहीत, पण तुम्ही मला ओळखता. त्यामुळे कृपया माझी ही नम्र विनंती मान्य करा.”
नाना पाटेकरांवर तनुश्री दत्ताने केलेले आरोप
तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर गंभीर आरोप केले होते. २००८ मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ (२००९) या चित्रपटाच्या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान नाना पाटेकर यांनी तिचा लैंगिक छळ केला होता, असा दावा तिने केला होता. तसेच तिने विरोध करूनही काही डान्स स्टेप्स गाण्यात अॅड केले होते, असं तिचं म्हणणं होतं. मात्र, नाना पाटेकर यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.
MeToo मोहिमेदरम्यान तनुश्री दत्ताने पुन्हा या विषयावर आपली बाजू मांडली होती. तसेच नाना पाटेकर, कोरिओग्राफर गणेश आचार्य, दिग्दर्शक राकेश सारंग आणि निर्माते समी सिद्दीकी यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, पुराव्यांअभावी पोलिसांनी एका वर्षानंतर हा खटला बंद केला होता.
