दिग्गज अभिनेत्री तन्वी आझमी यांनी आजवर मोठ्या पडद्यावर एकापेक्षा एक उत्तम भूमिका वठवल्या आहेत. त्या वैयक्तिक आयुष्यात खूप स्पष्टवक्त्या व आपली बाजू ठामपणे मांडणाऱ्या आहेत. त्या बंडखोर आहेत, असं त्यांना वाटतं. ‘बाजीराव मस्तानी’ मध्ये रणवीर सिंगच्या आईची दमदार भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या तन्वी नुकत्याच ‘दिल, दोस्ती, डिलेमा’ या वेब सीरिजमध्ये अनुष्का सेनच्या आजीच्या भूमिकेत झळकल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तन्वी आझमी अन् बंडखोरी

‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत तन्वी यांना, ‘त्या वाढत्या वयात बंडखोर होत्या का?’ असा प्रश्न विचारण्यात आलं. यावर त्या म्हणाल्या, “मी खूप आज्ञाधारक मुलगी होते, पण नंतर अचानक काहीतरी घडलं. माझ्या रक्तात सुप्त बंडखोरपणा होता. त्याचाच परिणाम म्हणून मी बंड करून लग्न केलं. एका महाराष्ट्रीय ब्राह्मण मुलीने मुस्लीम पुरुषाशी लग्न केल्यामुळे जणू काही संपूर्ण मुंबईत उद्रेक झालाय अन् जगाचा अंत झालाय असं वाटत होतं. खरं तर माझ्यासाठी तेव्हापासून बंडखोरी सुरू झाली आणि ती कायम राहिली.”

“ती मला समजू शकली नाही”, ‘हीरामंडी’ फेम अभिनेत्याने सांगितलं मराठी अभिनेत्रीशी ब्रेकअपचं कारण; म्हणाला…

तन्वी आझमींनी सांगितली आजोबांची आठवण

‘दिल, दोस्ती, डिलेमा’ मध्ये तन्वी यांनी एका आजीची भूमिका केली आहे, जी थोडी हळव्या मनाची अन् थोडी कठोर आहे. या भूमिकेसाठी खऱ्या आयुष्यातील आजी-आजोबांच्या वागण्यातले संदर्भ आहेत का? असं त्यांना विचारण्यात आलं. “मी एका संयुक्त कुटुंबात वाढले आहे, मला माहित आहे की तुमच्या आजूबाजूला सतत खूप लोक असले की कसं वाटतं. मला माझ्या आजोबांची खूप आठवण येते, त्यांनी माझे खूप लाड केले होते. मी आठ वर्षांचे होईपर्यंत ते मला सोबत घेऊन फिरायचे. खरं तर आमच्या शोमध्ये जे दिसतंय ते आजच्या मुलांना अनुभवायला मिळेलच असं नाही, खासकरून शहरात. कारण शहरातील आई-वडील आपल्या मुलांना आजी-आजोबांबरोबर राहायला पाठवत नाहीत,” असं तन्वी आझमी म्हणाल्या.

सैफच्या पहिल्या बायकोशी शर्मिला टागोर यांचं कसं आहे नातं? सारा अली खान खुलासा करत म्हणाली, “माझ्या आईला…”

मला सर्वांचा अभिमान वाटतो – तन्वी आझमी

तन्वी आझमी या कवी आणि गीतकार कैफी आझमी आणि शौकत आझमी यांच्या सून आहेत. त्या शबाना आझमी यांच्या वहिनी व सिनेमॅटोग्राफर बाबा आझमी यांच्या पत्नी आहेत. इतक्या मोठ्या कुटुंबाचा भाग असल्याने कधी दबाव जाणवला का? असं विचारल्यावर तन्वी म्हणाल्या, “अशा कुटुंबाचा एक भाग असणं खूप छान वाटतं, पण त्यामुळे मला कधीच त्रास झाला नाही. इतरांनी जे मिळवलं, ते मला मिळवावं लागेल, असं कधीच वाटलं नाही. त्यांचा वेगळा प्रवास आहे, जोपर्यंत मला चांगलं काम मिळत राहील तोवर मी माझ्या प्रवासात आनंदी आहे. माझं लक्ष्य माझं काम आहे. माझ्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीने किती काम केलं याकडे माझं कधीच लक्ष नव्हतं. आपल्या सर्वांच्या जमेच्या बाजू असतात, तसाच कमकुवतपणाही असतो म्हणून मी कधीही स्वतःची तुलना इतरांशी केली नाही. माझ्या कुटुंबातील यश मिळविणाऱ्यांमुळे मी त्यांच्याहून कमी आहे, असं वाटलं नाही. मला त्या सर्वांचा खूप अभिमान वाटतो.”

तन्वी आझमी यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्या नुकत्याच आलेल्या प्राइम व्हिडीओतील ‘दिल, दोस्ती, डिलेमा’ या सीरिजमध्ये दिसल्या होत्या. याशिवाय ‘मामला लीगल है’ व ‘ओले आले’ या मराठी चित्रपटातही त्यांनी काम केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tanvi azmi on marrying baba azmi says brahmin maharashtrian girl married a muslim it was the end of the world hrc