बॉलीवूडमधील काही सुंदर आणि निरागस अभिनेत्रींपैकी एक म्हणजे कियारा अडवाणी. कियारा ही बॉलीवूडच्या अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने तिच्या कठोर परिश्रमाने, अगदी कमी काळात कौतुकास्पद यश मिळवलं आहे. कियाराने २०१४ मध्ये ‘फगली’ या मल्टीस्टारर कॉमेडी चित्रपटातून इंडस्ट्रीत प्रवेश केला. त्यानंतर तिने मागे वळून पहिलंच नाही. कियाराने तिच्या आजवरच्या उत्तम अभिनयाने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.
‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’, ‘कबीर सिंग’, ‘गुड न्यूज’, ‘गिल्टी’, ‘लक्ष्मी’, ‘इंदू की जवानी’ आणि ‘शेरशाह’ अशा अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या कियाराचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. जगभरात तिचे लाखों चाहते आहेत. मात्र नुकतंच एका इन्फ्लुएन्सरने कियाराला ओळखत नसल्याचं म्हटलं. त्याने कियाराबरोबरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि या व्हिडीओच्याखाली त्याने कॅप्शनमध्ये ‘ही कोण आहे’ असं विचारलं आहे.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तायो रिक्कीने नुकत्याच एका कार्यक्रमामधील अभिनेत्रीबरोबर पोज देतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओसह त्याने “ही मुलगी कोण आहे? हे कोणाला माहिती आहे का?” असं म्हटलं. ज्यामुळे त्याने स्वत:वर कियाराच्या चाहत्यांचा संताप ओढावून घेतला आहे. तायो रिक्कीने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कियाराच्या अनेक चाहत्यांनी त्याच्या टिप्पणीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
या व्हिडीओखाली कियाराच्या काही चाहत्यांनी “आम्ही सर्वजण हिला ओळखतो, पण तू कोण आहेस?”, “तिच्यामुळेच मी माझ्या आयुष्यात तुला पहिल्यांदा पाहत आहे”, “आम्ही या सुंदर महिलेला ओळखतो. ती बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे; पण आम्ही तुला ओळखत नाही”. या आणि अशा अनेक कमेंट्सद्वारे तायो रिक्की कियाराच्या चाहत्यांकडून टीकेचा धनी बनला आहे.
‘टिरा’ या ब्रॅंडला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी तायो रिक्की आणि कियारा समोरासमोर आले. पण त्याने अभिनेत्रीला ओळखलंच नाही आणि याबद्दल त्याने थेट सोशल मीडियावरच प्रश्न विचारल्याने सध्या हा चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, कियाराच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती सध्या ‘वॉर २’मुळेही बरीच चर्चेत आहे.
दरम्यान, तायो रिक्की हा एक ऑस्ट्रेलियन कंटेंट क्रिएटर, इंस्टाग्राम मॉडेल आणि गायक आहे. याशिवाय तो एक युट्यूबरसुद्धा आहे. आपल्या गाण्याचे अनेक व्हिडीओ तो युट्यूबद्वारे शेअर करत असतो. सोशल मीडियावर त्याचा बराच मोठा चाहतावर्गही आहे. चाहत्यांसाठी तो विविध प्रकारचा कंटेट शेअर करत असतो. अशातच त्याने कियाराबरोबरचा व्हिडीओ शेअर केला आहे.