scorecardresearch

‘व्हर्जिनिटी टेस्ट’सारख्या भयानक प्रथेवर भाष्य करणाऱ्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; ‘ही’ अभिनेत्री करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच या अभिनेत्रीने तिचा दूसरा चित्रपट स्वीकारला आहे

movie on virginity test
फोटो : लोकसत्ता ग्राफीक टीम

कौमार्य चाचणी ही एक प्रदीर्घ काळापासून सुरु असणारी कुप्रथा आहे. जगातील किमान २० देशांमध्ये यासंदर्भातील प्रकरणं समोर आली आहेत. बहुतांश प्रकरणात तरुणींच्या विवाहयोग्यतेचा निकष म्हणून पालक किंवा संभाव्य जोडीदाराकडून अशी चाचणी केली गेल्याचे समोर आले आहे. नोव्हेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने व्हर्जिनिटी टेस्ट म्हणजेच कौमार्य चाचणीवर बंदी घातली. यासंदर्भात न्यायालयाने दिल्ली पोलिसांना फटकारलं आहे. व्हर्जिनिटी टेस्ट ही लिंगभेद करणारी, घटनाविरोधी आणि अमानवी असल्याचं न्यायालयानं सुनावणीवेळी नमूद केलं.

याच विषयाला हात घालणारा एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘एक कोरी प्रेम कथा’ हा चित्रपट या गंभीर मुद्द्यावर भाष्य करणार आहे. आजही भारतातील बऱ्याच ठिकाणी ही कौमार्य चाचणी केली जाते आणि त्यावर मुलगी लग्नासाठी योग्य का अयोग्य आहे ठरवले जाते. जर ती या चाचणीत नापास झाली तर तिचा प्रचंड छळ केला जातो. याच गोष्टीवर कटाक्ष टाकणाऱ्या ‘एक कोरी प्रेम कथा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

आणखी वाचा : ‘३ इडियट्स’च्या सीक्वलबद्दल करीना कपूरचा मोठा खुलासा; राग व्यक्त करत म्हणाली “माझ्याशिवाय…”

या चित्रपटाचे दिग्दर्शन चिन्मय पुरोहित यांनी केले आहे. तर यात मुख्य भूमिकेत खनक बुद्धीराजा ही अभिनेत्री आपल्याला दिसणार आहे. याबरोबरच अक्षय ओबेरॉय, राज बब्बर, पुनम धील्लोनसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या टीझरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

खनक बुद्धीराजा ही अभिनेत्री या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. इतकंच नव्हे तर हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच तिने तिचा दूसरा चित्रपट ‘जॉनी जंपर’ साईन केला आहे. खनक एक आर्किटेक्टदेखील आहे. चित्रपटसृष्टीत ती स्वतःच्या बळावर आली आहे. याआधी तिने मिस नॉर्थ इंडिया हा खिताब जिंकला असून मॉडेलिंगमध्येही नशीब आजमावलं आहे. या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेविषयी अद्याप खुलासा झालेला नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 14:26 IST

संबंधित बातम्या