Tejaswini Kolhapure on Shraddha Kapoor Marriage : श्रद्धा कपूर राहुल मोदीला डेट करत आहे. दोघेही बऱ्याच काळापासून एकत्र आहेत. त्यामुळे आता श्रद्धा व तिचा बॉयफ्रेंड राहुल मोदी यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. दोघांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण श्रद्धाची मावशी तेजस्विनी कोल्हापुरेने भाचीच्या लग्नाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.
तेजस्विनी कोल्हापुरे ही एक यशस्वी ‘रॅम्प मॉडेल’ आहे. तिने अनेक नामवंत डिझाइनर्ससाठी २०० पेक्षा जास्त फॅशन शो केले आहेत. तिने ‘मुझे चाँद चाहिए’ या टीव्ही मालिकेत काम केलं होतं. तसेच अनुराग कश्यप यांच्या बहुचर्चित ‘अग्ली’ (Ugly) या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर तिने पाच, रावण, हॅप्पी फिर भाग जायेगी या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
श्रद्धाच्या लग्नाबद्दल मावशीची प्रतिक्रिया
‘द फ्री प्रेस जर्नल’ला दिलेल्या एका मुलाखतीत तेजस्विनी कोल्हापुरेला श्रद्धा कपूरच्या लग्नाबद्दल सुरू असलेल्या चर्चांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तेजस्विनी हसत म्हणाली, “खरंच? मला याबद्दल काहीच माहित नाही. मला याची काहीच कल्पनाही नाही.”
तेजस्विनी कोल्हापुरेला वाटतो श्रद्धाचा अभिमान
श्रद्धा कपूर आपल्या कुटुंबाचा वारसा अभिमानाने पुढे नेतेय, त्याबद्दल मावशी तेजस्विनीने तिचं कौतुक केलं. “ही खूप आनंद देणारी भावना आहे. मला वाटतं कुटुंबातील प्रत्येकाचं यात योगदान राहिलंय. पद्मिनीने याची सुरुवात केली होती. पद्मिनीचे जे स्टारडम होते, खरं तर तो काळच वेगळा होता. तेव्हाची तुलना आजच्या काळाशी करता येणार नाही. नक्कीच श्रद्धाने हा वारसा आता पुढे नेला आहे. कुटुंबाचं नाव ती ज्या पद्धतीने पुढे नेतेय त्याचा आम्हा सर्वांना खूप आनंद आहे,” असं तेजस्विनी कोल्हापुरे म्हणाली.
या वर्षाच्या सुरुवातीला बातम्या आल्या होत्या की, श्रद्धा उदयपूरमध्ये शाही पद्धतीने लग्न करण्याच्या तयारीत आहे. तिचा भाऊ सिद्धांत कपूरनेही या अफवांवर प्रतिक्रिया दिली होती. “ही तर माझ्यासाठीही बातमी आहे,” असं सिद्धांत कपूर म्हणाला होता.
श्रद्धा कपूर व राहुल मोदीचं नातं
श्रद्धा कपूर व राहुल मोदीच्या डेटिंगच्या चर्चा बऱ्याच वर्षापासून होत्या. पण २०२४ मध्ये ते एकत्र डेटवर जाताना दिसले, त्यानंतर दोघांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला. त्यानंतर दोघेही बरेचदा एकत्र प्रवास करताना दिसले. श्रद्धा त्याच्याबरोबरचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करते. मात्र, राहुलबरोबर नात्यात असल्याची जाहीर कबुली अद्याप तिने दिलेली नाही. श्रद्धाने राहुलबरोबचा वडापाव डेटचा फोटोही पोस्ट केला होता.
श्रद्धा कपूरचे आगामी चित्रपट
श्रद्धा कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती शेवटची स्त्री २ या हॉरर कॉमेडी चित्रपटात झळकली होती. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. श्रद्धा ‘तुंबाड’ चित्रपटाचा प्रीक्वेल असलेल्या ‘पहाडपांगिरा’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसेल, अशी चर्चा आहे. तसेच ती ‘नागिन’ या सुपरनॅचरल चित्रपटात झळकणार आहे. श्रद्धा ‘स्त्री ३’ आणि ‘भेडिया २’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराष्ट्राच्या प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी आणि लोककलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित चरित्रात्मक चित्रपटात श्रद्धा महत्त्वाची भूमिका साकारेल, अशी शक्यता आहे.
