Bhumika Chawla Bharat Thakur Wedding: बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री भूमिका चावला हिने आपल्या अभिनयाने व साध्या आणि सोज्वळ लूकने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. २००३ मध्ये सलमान खानसोबत ‘तेरे नाम’ चित्रपटातील ‘निर्जरा’ ही तिची भूमिका आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे. भूमिकाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल सर्वांनाच माहिती आहे, पण तिचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच रंजक आहे. भूमिकाने प्रसिद्ध योग गुरु भरत ठाकूर यांच्याशी लग्न केले आहे. फिटनेस आणि मानसिक शांतीसाठी योग शिकायला जात असताना तिची आणि भरत यांची पहिली भेट झाली. सुरुवातीला गुरु-शिष्या असलेले हे नाते मैत्रीत आणि नंतर प्रेमात बदलले. तब्बल ४ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी २००७ मध्ये नाशिकजवळील एका मंदिरात अत्यंत साधेपणाने लग्न केले.
भूमिकाने २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘युवकुडू’ या तेलुगू चित्रपटातून आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेरे नाम’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील ‘निर्जरा’ या भूमिकेने तिला रातोरात देशभरात लोकप्रियता मिळवून दिली.
भूमिका चावलाचे चित्रपट
भमिकाचे ‘कुशी’, ‘ओके ओक्काडू’, ‘सिंहाद्री’ आणि ‘अथाडू’ हे तिचे दाक्षिणात्य चित्रपट प्रचंड यशस्वी ठरले. बॉलीवूडमध्ये तिने ‘तेरे नाम’ व्यतिरिक्त तिने अभिषेक बच्चनबरोबर ‘रन’, सलमान खानबरोबर ‘दिल ने जिसे अपना कहा’, ‘सिलसिले’, ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ हे चित्रपट केले. धोनीच्या बायोपिकमध्ये तिने सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीची भूमिका साकारली होती. तसेच ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमातही ती झळकली होती.
भूमिका चावलाचे पती भरत ठाकूर कोण आहेत?
भूमिका चावलाचे पती भरत ठाकूर हे भारतातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि नावाजलेले योग गुरू व व्यावसायिक आहेत. त्यांनी ‘आर्ट ऑफ मॅपिंग’ आणि ‘आर्ट ऑफ योगा’ यांसारख्या संकल्पनांद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर योगशिक्षण दिले आहे. भूमिका आणि भरत यांची पहिली भेट एका योगा क्लासदरम्यान झाली होती. भूमिका चित्रपटांमध्ये काम करत असताना तिच्या फिटनेस आणि मानसिक शांतीसाठी योग शिकायला जात असे. तिथेच भरत ठाकूरशी तिची भेट झाली. सुरुवातीला त्यांच्यात केवळ गुरु-शिष्या आणि चांगल्या मित्रांचे नाते होते. हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. भरत यांच्या साध्या आणि अभ्यासू स्वभावाने भूमिकाचे मन जिंकले.
भूमिका चावलाने एका मंदिरात केलेलं लग्न
भूमिका आणि भरत यांनी सुमारे ४ वर्षे एकमेकांना डेट केले. नावाजलेली अभिनेत्री असूनही भूमिका आणि भरत यांनी अतिशय साधेपणाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. २१ ऑक्टोबर २००७ रोजी नाशिक जवळील एका मंदिरात अत्यंत खासगी आणि पारंपरिक पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला. या लग्नाला दोन्ही बाजूंचे फक्त जवळचे नातेवाईक आणि मोजकेच मित्र उपस्थित होते. ग्लॅमरस विश्वापासून दूर त्यांनी निसर्गरम्य वातावरणात लग्न केले. लग्नानंतर ७ वर्षांनी २०१४ मध्ये त्यांना एक मुलगा झाला, त्याचे नाव यश आहे.
लग्नानंतर कौटुंबिक आयुष्याला प्राधान्य दिल्यानंतर भूमिका आता पुन्हा एकदा सिनेसृष्टीत सक्रिय झाली आहे. अलीकडेच ती ‘युफोरिया’ (Euphoria) या दाक्षिणात्य चित्रपटात झळकली होती. याशिवाय ती सोशल मीडियावर आपल्या अपडेट्स, फोटो आणि व्हिडिओंच्या माध्यमातून चाहत्यांशी सतत कनेक्टेड राहते.
