Salman Khan’s Tere Naam Re-Released In Theaters : बॉलीवूडमध्ये गाजलेले चित्रपट पुन्हा रिलीज होण्याचा सध्या ट्रेंड सुरू आहे. बॉलीवूडमध्ये यापूर्वी प्रेमकथेवर आधारित अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आणि त्यांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. त्यापैकीच एक म्हणजे सलमान खानची मुख्य भूमिका असलेला ‘तेरे नाम’ हा चित्रपट.

सलमान खानच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी ‘तेरे नाम’ हा एक आहे. त्यामध्ये अभिनेत्याचा वेगळा लूक, त्याने साकारलेली प्रियकराच्या भूमिकेची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये कायम आहे. त्यामुळेच आता ‘तेरे नाम’ पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहांत मोठ्या संख्येनं गर्दी केल्याचं दिसून‌ येतंय. अशातच या चित्रपटानं पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशीच किती कमाई केली याबद्दल जाणून घेणार आहोत.

‘तेरे नाम’ने पहिल्या दिवशी किती कमावले?

सतीश कौशिक दिग्दर्शित भाविका चावला आणि सलमान खान यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘तेरे नाम’ हा चित्रपट शुक्रवार, २७ फेब्रुवारी रोजी सिनेमागृहांत पुन्हा प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘पिंकव्हिला’च्या अहवालानुसार ‘तेरे नाम’ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जवळपास २५ लाखांची कमाई केली आहे. परंतु, सलमान खाननं ‘तेरे नाम’बद्दल कुठलीही पोस्ट न केल्यामुळे चित्रपट पुन्हा प्रदर्शित होण्याआधी त्याची अपेक्षित चर्चा झाली नाही.

‘तेरे नाम’ शुक्रवारी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची क्रेझ पाहता, शनिवारी आणि रविवारी बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट मोठ्या प्रमाणात कमाई करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाची प्रचंड चर्चा सुरू आहे. चित्रपटातील सलमान खानची एन्ट्री, गाणी यांचे व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होताना दिसत आहेत. सोशल मीडियावर प्रेक्षकांनी ‘तेरे नाम’ थिएटरमध्ये पाहत असतानाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यावर अनेक नेटकऱ्यांनी सलमान खानबद्दल भरभरून प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

अनेकदा चित्रपटांबद्दल असं होतं की, ‘तो’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्याला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. परंतु, प्रेक्षकांमध्ये त्याची क्रेझ मोठ्या प्रमाणात असते. असंच काहीच झालेलं सलमान खानच्या ‘तेरे नाम’बरोबर. २००३ मध्ये सलमान खानचा चित्रपट प्रदर्शित झाला होता; परंतु, बॉक्स ऑफिसवर चित्रपट खास कमाई करू शकला नव्हता. त्यावेळी ‘तेरे नाम’ या चित्रपटानं माध्यमांच्या वृत्तानुसार फक्त १५.१४ कोटींचा गल्ला जमवला होता. १० कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटानं जगभरात २५.५५ कोटींची कमाई केलेली.