‘तेरी मिट्टी’ फेम लोकप्रिय बॉलीवूड गायक बी प्राक पुन्हा एकदा बाबा झाला आहे. तीन वर्षांपूर्वी नवजात मुलाला गमावल्यानंतर बी प्राकच्या आयुष्यात आता पुन्हा आनंदाचा क्षण आला आहे. बी प्राकने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून मुलाच्या जन्माची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. बी प्राकने श्री कृष्णाचा बाल रुपातील एक फोटो शेअर केला आहे.
“राधेश्यामच्या कृपेने, आम्हाला १ डिसेंबर २०२५ रोजी मुलगा झाला आहे. आमची मनं कृतज्ञता आणि आनंदाने भरली आहेत. सूर्य पुन्हा उगवला आहे, जो आमच्या आयुष्यात प्रकाश, आशा आणि नवीन सुरुवात घेऊन आला आहे.” बी प्राकने त्याच्या बाळाचे नाव देखील जाहीर केले आणि पोस्टमध्ये नावाचा अर्थही सांगितला.
बी प्राकने मुलाचं नाव काय ठेवलंय?
बी प्राकने मुलाचं नाव द्विज बच्चन ठेवलंय. ‘द्विज बच्चन. पुनर्जन्म – एक आध्यात्मिक पुनर्जन्म,’ असं पोस्टमध्ये लिहिलंय. ‘सब राधे राधे हैं। जय श्री कृष्ण।’ असं कॅप्शन बी प्राकने या पोस्टला दिलं आहे.
बी प्राकने ही आनंदाची बातमी शेअर केल्यावर चाहत्यांनी त्याच्या पोस्टवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी बी प्राक व मीराने मुलाच्या जन्मासाठी अभिनंदन केले आहेत.
बी प्राकचे खरे नाव काय?
बी प्राक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गायकाचे खरे नाव प्रतीक बच्चन आहे. त्याच्या पत्नीचे नाव मीरा बच्चन आहे. मीरा पंजाबी संगीत क्षेत्रात खूप लोकप्रिय आहे. बी प्राक व मीराने २०१९ मध्ये लग्न केलं होतं.
बी प्राकच्या मुलाचे निधन
२०२० मध्ये बी प्राकच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला. २०२२ मध्ये त्यांना दुसरा मुलगा झाला. पण जन्मानंतर लगेचच मुलाचं निधन झालं होतं. बी प्राकच्या पत्नीला बाळाला बघताही आलं नव्हतं, कारण त्याने त्याआधीच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले होते. यामुळे पत्नी अजूनही नाराज असल्याचं गायकाने बरेचदा सांगितलं होतं.
“आम्हाला कळवण्यास अत्यंत दुःख होत आहे की आमच्या नवजात बाळाचं निधन झालंय. आई-वडील म्हणून आमच्यासाठी हा खूप कठीण काळ आहे. त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आम्ही आभार मानतो. या दुःखद काळात आम्हाला एकांत द्यावा,” अशी पोस्ट बी प्राकने मुलाच्या निधनाबद्दल केली होती.
