Cockroach Janta Party Movie Announcement: दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट (NEET) पेपरफुटी व शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांच्या विरोधात आक्रमक आंदोलन करण्यात आले होते. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने ३६ दिवस केलेल्या आक्रमक आंदोलनाला संपूर्ण देशातून पाठिंबा मिळाला. या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं असलं तरी अभिजित दिपके यांच्या या आंदोलनाचं लोण संपूर्ण देशामध्ये पसरलं. त्यांच्या या आंदोलनाला संपूर्ण देशातील तरुणांनी आणि खास करुन जेन-झी तरुणांनी पाठिंबा दिला.
‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) आंदोलनाची गोष्ट आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या आंदोलनावर आधारित फीचर फिल्मची तयारी सुरू झाली असून, चित्रपटाचं नाव ‘द अॅक्सिडेंटल कॉक्रोच पार्टी’ असं निश्चित करण्यात आलं आहे. या शीर्षकाची अधिकृत नोंदणीही करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुमारे २० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. जयपूरचे गोविंद देव ब्रह्म यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यामुळे तरुणांनी उभारलेल्या या अनोख्या आंदोलनाची गोष्ट आता सिनेमाच्या स्वरुपात मांडण्यात येणार आहे.
चित्रपटात आंदोलनाची पार्श्वभूमी मांडण्यात येणार
चित्रपटाच्या निर्मात्यांनी या सिनेमाची घोषणा केली असून सिनेमाच्या पटकथा लेखनासाठी संशोधन आणि अभ्यास केल्याचे सांगितले आहे. या चित्रपटासाठी विविध स्तरांवर संशोधन आणि अनेक विषयांचा सखोल अभ्यास केल्यानंतर हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याची तयारी सुरू असल्याचं निर्मात्यांनी सांगितलं आहे. या चित्रपटात आंदोलनाची संपूर्ण पार्श्वभूमी, त्यामागील राजकीय घडामोडी आणि आंदोलकांच्या प्रमुख मागण्या मांडल्या जाणार आहेत.
सर्वांसमोर न आलेल्या गोष्टींचा उलघडा होणार
निर्मात्यांचा दावा आहे की, हा चित्रपट केवळ आंदोलनातील घटनांपुरता मर्यादित नसून विविध पैलूंवर आधारित असणार आहे. आंदोलनामागील रणनीती, त्यावेळचं राजकारण, आणि राजकीय घडामोडी दाखवण्यात येणार आहे. त्याचबरोबर आतापर्यंत सर्वांसमोर न आलेल्या अनेक गोष्टीही या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. त्यामुळे आंदोलनाशी संबंधित अनेक राजकीय घडामोडी प्रेक्षकांसमोर आणल्या जाणार आहेत. पॉलिटिकल ड्रामा असलेल्या या चित्रपटातून, आंदोलनाची पडद्यामागची कहाणी प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
सिनेमाच्या प्री-प्रॉडक्शनची तयारी वेगाने सुरू
सध्या या चित्रपटाची पटकथा लिहिण्याचं काम सुरू आहे. चित्रपटाची पूर्वतयारी सुरु असून प्री-प्रॉडक्शनची तयारी वेगाने सुरू आहे. याशिवाय चित्रपटाच्या शूटिंगसाठी जागा ठरवण्याचं काम सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक, प्रमुख कलाकार आणि सह-निर्मात्यांबाबत मुंबईमध्ये अंतिम टप्प्यात चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप कोणत्याही अभिनेता, अभिनेत्री किंवा दिग्दर्शकाच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.’द अॅक्सिडेंटल कॉक्रोच पार्टी’ हा सिनेमा २०२७ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या सिनेमामध्ये अभिजीत दिपके यांच्यासह इतर आंदोलकांच्या भूमिका कोण साकारणार हे अद्याप समोर आलेले नाही.
