The Bengal Files re-released : काश्मीर फाईल्सच्या प्रचंड यशानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आणखी एका राज्याचे नाव घेऊन चित्रपट तयार केला. विवेक अग्निहोत्रीने पश्चिम बंगालमधील परिस्थिती सांगणारा ‘द बंगाल फाइल्स’ चित्रपट दिग्दर्शित केला. मात्र, बंगालमध्येच या चित्रपटावर ममता सरकारने बंदी घातली होती. ‘द बंगाल फाईल्स’ ५ सप्टेंबर २०२५ रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला, पण त्यावेळी पश्चिम बंगालमधील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला नाही. आता मात्र सत्तापालट झाल्यानंतर आणि भाजपाला प्रचंड यश मिळाल्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
यापूर्वी ‘द बंगाल फाइल्स’ हा चित्रपट शुक्रवार, ८ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल अशी माहिती समोर आली होती. मात्र, दिग्दर्शक अग्निहोत्री यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर हे दावे फेटाळून लावले आणि सांगितले की, ‘द बंगाल फाइल्स’ चित्रपट पश्चिम बंगालमध्ये पुढील शुक्रवारी, १५ मे रोजी प्रदर्शित होईल. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या प्रचंड विजयानंतर विवेक अग्निहोत्रीने आता हा चित्रपट राज्यात प्रदर्शित होईल याची माहिती दिली आहे.
यापूर्वी २०२५ साली चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. ‘द बंगाल फाइल्स’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला होता. आता पश्चिम बंगालमधील प्रेक्षक या चित्रपटाला कसा प्रतिसाद देणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
२०२५ साली दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने पश्चिम बंगालमधील चित्रपटगृहांच्या मालकांशीदेखील संवाद साधला होता आणि चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत बातचीत केली होती. मात्र, सिनेमागृह चालकांनीदेखील ‘द बंगाल फाइल्स’चित्रपट दाखवण्यास नकार दिला. सिंगल-स्क्रीन सिनेमाघर असून टायगर श्रॉफच्या ‘बाघी ४’ सोबत आमचा आधीच करार झाला आहे आणि ‘धूमकेतू’ हा बंगाली चित्रपट चांगली कमाई करत असल्याचे कारण देत त्यांनी ‘द बंगाल फाइल्स’ दाखवणार नसल्याचे चित्रपटगृहांच्या मालकांनी सांगितले. आता मात्र सरकार बदलल्यामुळे ‘द बंगाल फाईल्स’चा रस्ता मोकळा झाला आहे. हा चित्रपट पश्चिम बंगालमध्ये पुनर्प्रदर्शित केला जात आहे.
‘द बंगाल फाइल्स’वर बंदी का घालण्यात आली?
पश्चिम बंगालमध्ये २०२५ पासून निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. राजकीय मोट बांधणी सुरू असताना ‘द बंगाल फाईल्स’ चित्रपट आल्याने ममता सरकारच्या अडचणींमध्ये वाढ झाली. मात्र, तत्कालीन ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसी सरकारने ‘द बंगाल फाइल्स’वर कोणतीही अधिकृत बंदी घातली नव्हती. मात्र, चित्रपटगृह मालकांनी परस्पर संमतीने चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला. अनेक चित्रपटगृह मालकांनी असाही दावा केला की, त्यांच्याकडे अनेक चित्रपटांसाठी आधीच करार झाले होते आणि चित्रपटगृहांची उपलब्धता मर्यादित होती. जेव्हा कोलकाता आणि बंगालच्या इतर भागांमध्ये चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित झाला नाही, तेव्हा विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांनी आरोप केला की राजकीय दबावामुळे त्यावर बंदी घालण्यात आली आहे.
