विकी कौशलचा ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ हा चित्रपट २२ सप्टेंबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाच्या यशानंतर विकीचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी ओपनिंग करेल, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. आकडेवारीनुसार पहिल्याच दिवशी चित्रपटाने निराशाजनक कामगिरी केली. तर आता पहिल्या वीकेंडची सुरुवातही फारशी चांगली झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ने पहिल्या दिवशी १.४० कोटी रुपयांची कमाई केली. तर सॅकनिकच्या रिपोर्टनुसारआता दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी या चित्रपटाने १.८ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात विकी कौशल व मानुषी चिल्लर ही दोघेही प्रमुख भूमिकेत आहेत. आणखी वाचा : गौर गोपाल दास यांना दीक्षा घेण्याआधी आवरता आला नाही 'पीयूष' प्यायचा मोह; जाणून घ्या 'पीयूष' या पेयाचा इतिहास दोन दिवसांनी मिळून या चित्रपटाने ३.२ कोटींची कमाई केली आहे. विकीच्या या चित्रपटाबरोबरच शिल्पा शेट्टीचा 'सुखी' हा चित्रपटही प्रदरक्षिती झाला. त्यानेही बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवलेली नाही. एकूणच शाहरुख खानच्या 'जवान'ची हवा अजूनही कायम असल्यानेच या दोन्ही चित्रपटांच्या कमाईवर त्याचा परिणाम झाला असल्याचं दिसून येत आहे. 'द ग्रेट इंडियन फॅमिली'मध्ये विकीने भजन कुमार नावाची भूमिका साकारली आहे. “या चित्रपटाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा चित्रपट संपल्यानंतर, प्रेक्षक त्यांच्या कुटुंबासह चेहऱ्यावर हास्य घेऊन त्यांच्या घरी परत जातील. मी पहिल्यांदा चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली तेव्हाही माझ्याही त्याच भावना होत्या,” असं विकी एका मुलाखतीत म्हणाला होता.