The Kerala Story 2 Box Office : बऱ्याचदा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच जेव्हा तो वादाच्या भोवऱ्यात अडकतो तेव्हा काही वेळा त्या संमिश्र प्रतिक्रियांचा चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील आकड्यांवर परिणाम होतो. परंतु, याउलट काही चित्रपट यामधून मिळालेल्या माऊथ पब्लिसिटीमुळे बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करतात. त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे ‘द केरळ स्टोरी २’.
सुरुवातीला वादाच्या भोवऱ्यात अडकलेला ‘द केरळ स्टोरी २’ अखेर शुक्रवारी २७ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. प्रदर्शनानंतर चित्रपटाची कमाई सुरुवातीला थोडी मंदावली. परंतु, आता या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींच्या कमाईपर्यंत मजल गाठायला सुरुवात केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत किती कमाई केली याबद्दल जाणून घेऊयात…
दुसऱ्या दिवशी कमावले कोट्यवधी
विपुल अमृतलाल निर्मित ‘द केरळ स्टोरी २’ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर काही फार चांगली कमाई केली नसली तरी या चित्रपटाने आता दुसऱ्या दिवशी मात्र मोठे यश मिळवलेय, असे म्हणावे लागेल. ‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी फक्त लाखोंमध्ये कमाई केली होती. ‘द केरळ स्टोरी २’ने पहिल्या दिवशी फक्त ७५ लाखांचा गल्ला जमवलेला. मात्र, शनिवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये तब्बल ५२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ४.६५ कोटींचा गल्ला जमवला असून, आतापर्यंत या चित्रपटाने देशभरात ५.४ कोटींची एकूण कमाई केली आहे. कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी २’ हिंदी, तेलुगू व कानडी भाषेमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने हिंदी शोमार्फत मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे.
‘द केरळ स्टोरी’च्या पहिल्या भागाची कमाई
२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ या पहिल्या भागाच्या बॉक्स ऑफिसवरील आकड्यांबद्दल बोलायचे झाले, तर सीक्वेलच्या तुलनेत पहिल्या भागाने सुरुवातीच्या दिवसांमध्ये अधिक कमाई केली होती. अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी व सोनिया बलानी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या ‘द केरळ स्टोरी’ या थ्रिलर चित्रपटाने पहिल्या दिवशी ८.३ तीन कोटींची कमाई करत जबरदस्त ओपनिंग केली होती. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या पहिल्या भागाने ११ कोटींचा गल्ला जमवला होता. तेव्हासुद्धा चित्रपटाचा पहिला भाग वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. परंतु, याचा चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईवर कुठलाच परिणाम झाला नाही. जगभरात या चित्रपटाने ३०२ कोटींची कमाई केली होती.
‘द केरळ स्टोरी २’च्या कास्टबद्दल बोलायचं झालं, तर पहिल्या भागातील अभिनेत्रींचा यामध्ये समावेश नसून, सीक्वेलमध्ये नवीन अभिनेत्रींना संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री अदिती भाटिया, अलका गुप्ता, ऐश्वर्या ओझा, सुमित गहलावत हे कलाकार पाहायला मिळत आहेत.
