The Kerala Story 2 Controversy: ‘द केरला स्टोरी २: गोज बियॉन्ड’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. ट्रेलर पाहिल्यानंतर वादाला सुरुवात झाली.

कामाख्या नारायण सिंह यांनी ‘द केरला स्टोरी २: गोज बियॉन्ड’चे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटावर होणाऱ्या टीकेनंतर त्यांनी उत्तर दिले आहे. ते नेमकं काय म्हणाले आहेत, हे जाणून घेऊ…

“जर चित्रपटात आम्ही काही चुकीचे दाखवले असेल तर मी…”

कामाख्या नारायण सिंह यांनी नुकताच एएनआयशी संवाद साधला. ते म्हणाले, “मी डॉक्युमेंटरींची निर्मिती केली आहे. मी नेहमी समाजातील वाईट प्रथा तसेच समस्यांवर भाष्य करणारे चित्रपट व डॉक्युमेंटरी बनवल्या आहेत; जे प्रश्न उपस्थित करतात आणि लोकांना आजूबाजूला काय घडत आहे यावर विचार करण्यास प्रवृत्त करतात, म्हणूनच एखाद्या चित्रपट किंवा डॉक्युमेंटरीटाच्या प्रदर्शनापूर्वी मी त्या विषयाचा सखोल अभ्यास करतो, त्यामुळे समस्या पूर्णपणे समजून घेता येतात.”

Award Banner

पुढे ते म्हणाले, “मी माझे काम पूर्ण प्रामाणिकपणे केले आहे, माझ्यावर विश्वास ठेवा; जर चित्रपटात आम्ही काही चुकीचे दाखवले असेल तर मी चित्रपट निर्मिती सोडेन.”

“आम्ही केरळच्या विरोधात नाही…”

चित्रपट निर्माते विपुल शाह यांनीदेखील यावर वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, “आम्ही केरळच्या विरोधात नाही, केरळ देवभूमी आहे. राज्यातील ज्या वाईट गोष्टी आहेत, त्या शक्य तितक्या लवकर नाहीशा व्हाव्यात हीच आमची इच्छा आहे.”

या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांनी यावर टीका केली. काहींनी चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे यासाठी याचिका दाखल केल्या. लोकप्रिय दिग्दर्शक अनुराग कश्यपने देखील यावर टीका केली होती. तो म्हणाला होता की, “द केरला स्टोरी हा चित्रपट प्रोपगंडा आहे. ट्रेलरमध्ये ज्या पद्धतीने गोमांस खाऊ घालताना दिसत आहे, तसे कोण खाऊ घालते; असे तर कोणी खिचडीसुद्धा खात नाही. त्यांना सर्वांना खूश करायचे आहे, त्यांना फक्त पैसे कमवायचे आहेत, लोकांमध्ये फूट पडावी असे त्यांना वाटते.” अनुराग कश्यप असेही म्हणाला, “चित्रपट निर्माता लोभी आहे, त्याला फक्त पैसे कमवायचे आहेत.”

याबरोबरच केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनीदेखील यावर टीका केली होती. त्यांनी एक्स अकाउंटवर लिहिले होते की, या चित्रपटाचा सीक्वेल काढणे हा राज्यातील जातीय सलोखा बिघडवण्याचा आणखी एक प्रयत्न आहे. पहिल्या भागात आम्ही त्यांचा जातीय अजेंडा आणि खोटेपणा उघडपणे पाहिला आहे. धर्मनिरपेक्ष मूल्यांना बदनाम करण्याचा हा आणखी एक प्रयत्न आहे. त्यांचा तो प्रयत्न राज्यातील जनता पुन्हा एकदा तिरस्काराने नाकारेल.

दरम्यान, ‘द केरला स्टोरी २: गोज बियॉन्ड’ हा चित्रपट २७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.