The Kerala Story 2 1 Week Collection : २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द केरला स्टोरी’च्या यशानंतर, आता त्याचा सीक्वेल म्हणजेच ‘द केरला स्टोरी २’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. रिलीजआधीच झालेल्या वाद आणि चर्चांच्या केंद्रस्थानी असूनही, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.

कामाख्या नारायण सिंह यांनी दिग्दर्शित केलेला ‘द केरला स्टोरी २’ हा चित्रपट शुक्रवार, २७ फेब्रुवारीपासून प्रदर्शित झाला. सुरुवातीला चित्रपटाची कमाई संथ गतीनं सुरू झाली; पण वीकेंडमध्ये या चित्रपटानं चांगली कमाई केली. त्यात होळीच्या सुट्यांचा फायदा चित्रपटाच्या कमाईसाठी झाला.

रिलीजपूर्वीच हा चित्रपट बऱ्याच वादात अडकला होता. हा द्वेष पसरवणारा चित्रपट असल्याची टीका केरळच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यामुळे चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही झाली होती. मात्र, सर्व कायदेशीर अडथळे पार करून चित्रपट प्रदर्शित झाला. रिलीजच्या आठवडाभरानंतर या सिनेमानं किती कमाई केलीय, चला जाणून घेऊ…

‘द केरला स्टोरी २’चं आठवड्याचं कलेक्शन

‘द केरला स्टोरी २’च्या कलेक्शनबाबत सांगायचं झाल्यास, चित्रपटानं पहिल्या दिवशी ०.७५ कोटी कमावले. दुसऱ्या दिवशी ४.६५ कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी ४.७५ कोटी रुपये कमावले. नंतर चौथ्या, पाचव्या व सहाव्या दिवशी चित्रपटानं अनुक्रमे २.५ कोटी, ४ कोटी व ३.५ कोटी इतकं कलेक्शन केलं. Sacnilk च्या वृत्तानुसार, सातव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी चित्रपटानौ २.१९ कोटी कमावले. अशा प्रकारे चित्रपटाची सात दिवसांची एकूण कमाई २२.५५ कोटी इतकी झाली आहे.

बजेटच्या तुलनेत एकूण कमाई किती?

उल्का गुप्ता, अदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २८ कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. पहिल्या सात दिवसांत, सनशाइन पिक्चर्स या निर्मात्या कंपनीनं अंदाजे ७२% कमाई वसूल केली आहे. बजेटच्या तुलनेत चित्रपटाला जवळपास आठ कोटींची कमाई करणं आवश्यक आहे. येत्या आठवड्यात चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कामगिरी सुरळीत राहिली, तर चित्रपट पूर्ण बजेटचा आकडा पार करेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे आता दुसऱ्या आठवड्यात सिनेमाला प्रेक्षकांकडून किती प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, २०२६ मध्ये रिलीज झालेल्या बॉलीवूडच्या सिनेमांमध्ये फक्त सनी देओलचा ‘बॉर्डर २’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे. ‘मर्दानी ३’ व ‘ओ’रोमिओ’सारख्या मोठ्या चित्रपटांना अपेक्षित यश मिळालेलं नाही. त्यामुळे आता ‘बॉर्डर २’नंतर ‘द केरला स्टोरी २’ हा चित्रपट यंदाच्या आतापर्यंतच्या यशस्वी चित्रपटांच्या यादीत सामील होऊ शकतो, असं म्हटलं जात आहे.