The Kerala Story 2 Trailer: २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘द केरला स्टोरी २ : गोज बियॉन्ड’ असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मंगळवारी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यामध्ये धर्मांतराशी संबंधित एक भयावह गोष्ट पाहायला मिळत आहे.

‘द केरला स्टोरी २’चा थरकाप उडवणारा ट्रेलर

‘द केरला स्टोरी २: गोज बियॉन्ड’चा ट्रेलर तीन मिनिटे व सात सेकंदांचा आहे. सुरुवातीला ऐकायला येते की, इंशाअल्लाह, पुढील २५ वर्षांत भारत एक इस्लामिक राज्य असेल आणि संपूर्ण भारतात शरिया लागू केली जाईल. पुढे वेगवेगळ्या राज्यांतील दृश्ये पाहायला मिळतात. तसेच, द केरला स्टोरीप्रमाणेच दुसऱ्या भागातही तीन हिंदू मुलींची गोष्ट पाहायला मिळत आहे.

Award Banner

राजस्थानमधील एक कुटुंब त्यांच्या १६ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यामध्ये जात असल्याचे दाखवले आहे. त्यानंतर मध्य प्रदेशातील एक गोष्ट पाहायला मिळते. जिथे एका हिंदू मुलीला प्रेमाच्या नावाखाली फसवून, मग लग्नाचे आमिष दाखवले जाते आणि नंतर तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जातो.

ट्रेलरमध्ये दाखवलेल्या तिसऱ्या कथेत, केरळमधील एक मुस्लिम मुलगा त्याच्या हिंदू मुलीला लिव्ह-इन रिलेशनशिपसाठी विचारतो. जेव्हा ती मुलगी म्हणते की, ती धर्मांतर करणार नाही. तेव्हा तो मुलगा सुरुवातीला म्हणतो की, तो अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही; पण परिस्थिती बदलते.

ट्रेलरमध्ये तीन मुख्य पात्रांच्या आयुष्यात प्रेमाच्या नावाखाली रचले जाणारे एक मोठे षडयंत्र पाहायला मिळणार असल्याचे या ट्रेलरमध्ये दिसत आहे. या चित्रपटात उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा व अदिती भाटिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कामाख्या नारायण सिंह यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. तसेच, विपुल अमृतलाल शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

नेटकरी म्हणाले…

आता हा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांनी हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरेल, अशा कमेंट्स केल्या आहेत. तर काहींनी मुलींनी कायमच सतर्क राहावे, असे लिहिले आहे. तर अनेकांनी, मुलींनी हा चित्रपट पाहिला पाहिजे, असेही लिहिले आहे.

दरम्यान, आता हा चित्रपट किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.