सलमान खान आणि कतरिना कैफचा बहुचर्चित बहुप्रतीक्षित चित्रपट ‘टायगर ३’ १२ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. मात्र, आता चित्रपटाच्या कमाईत सातत्याने घट पाहायला मिळत आहे. दरम्यान, काल (१९ नोव्हेंबर) भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा चित्रपटाच्या कमाईवर परिणाम झाला आहे.




‘टायगर ३’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ४४.५ कोटींची कमाई केली होती; तर दुसऱ्या दिवशी ५९.२५, तिसऱ्या दिवशी ४४.३ कोटी, चौथ्या दिवशी २१.१ कोटी, पाचव्या दिवशी १८.५ कोटी, सहाव्या दिवशी १३ कोटी व सातव्या दिवशी १८ कोटींचा गल्ला जमवला होता. आता चित्रपटाच्या आठव्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. या चित्रपटाने आठव्या दिवशी केवल १०.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. सुरुवातीच्या कमाईचे आकडे पाहता, हा आकडा सगळ्यात कमी आहे. काल (१९ नोव्हेंबर) भारत-ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामुळे चित्रपगृहांमध्ये प्रेक्षकांची संख्याही कमी असल्याचे दिसून आले होते.
आतापर्यंत ‘टायगर ३’ ने भारतात २१७.९० कोटींचा व्यवसाय केला आहे. जगभरात या चित्रपटाने ३०० कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. मात्र, येत्या आठवडाभरात चित्रपटाच्या कमाईत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चित्रपटाच्या सुरुवातीच्या दिवसांच्या कमाईचे आकडे पाहिल्यास ‘टायगर ३’ हा या वर्षातला सुपरहिट चित्रपट ठरला आहे.
‘टायगर ३’मध्ये सलमान खान, कतरिना कैफबरोबर इमरान हाश्मीची मुख्य भूमिका आहे. इमरानने या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि शाहरुख खानने कॅमिओ केला आहे. ‘टायगर’ व ‘टायगर जिंदा है’प्रमाणे ‘टायगर ३’मध्येही प्रेक्षकांना सलमान आणि कतरिनाचा अॅक्शन लूक बघायला मिळत आहे.