Tiger Shroff Talks About Aerophobia : टायगर श्रॉफ बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याला त्याचे वडील लोकप्रिय अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्याकडून अभिनयाचा वारसा जरी मिळाला असला तरी या दोघांची स्टाईल एकमेकांपेक्षा वेगळी आहे. जॅकी श्रॉफ यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांतून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयानं अनेकांचं मनोरंजन केलं आहे. तर दुसरीकडे टायगर श्रॉफ त्याच्या डान्ससाठी आणि स्टंट करण्यासाठी ओळखला जातो.
टायगर श्रॉफनंही त्याच्या चित्रपटांतून त्याच्या हटके अंदाजानं अनेकांचं लक्ष वेधलं. तो नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणांसाठी ओळखला जातो. टायगर त्याच्या फिटनेसमुळेही अनेकदा चर्चेत असतो. तो ज्या सहजपणे स्टंट करतो त्यासाठी अनेकांकडून त्याचं कौतुक होतं. पण, तुम्हाला माहीत आहे का टायगर श्रॉफला एरोफोबिया आहे. (aerophobia) म्हणजेच विमान प्रवासाची भीती वाटते, जो अभिनेता कठीण स्टंट सहजपणे करण्यासाठी ओळखला जातो त्याला विमान प्रवासाची भीती वाटते. त्याबद्दल त्यानं स्वत: एका मुलाखतीत सांगितलं आहे. तो या समस्येवर मात करण्यासाठी उपचार (थेरपी) सुरू करण्याचा विचार करत असल्याचंही त्यानं सांगितलं आहे.
टायगर श्रॉफ काय म्हणाला?
टायगर त्याला असलेल्या एरोफोबियाबद्दल म्हणाला, “मी थेरपी सुरू करण्याचा विचार करतोय. मला एरोफोबिया आहे. मी खूपच धक्कादायक (टर्ब्युलंट) विमान प्रवासात होतो आणि… अशा प्रवासावर आपलं काहीही नियंत्रण नसतं, अशा वेळी मी काय करायचं? तेव्हापासून मला प्रत्येक विमान प्रवासाच्या काही दिवस आधी भीती वाटायला लागते. काही कारणांमुळे मला अजूनही त्यातून बाहेर पडता येत नाहीये.”
टायगर पुढे म्हणाला, “असं म्हणतात की, विमान प्रवास हा इतर सर्व ट्रान्स्पोर्टच्या तुलनेत सुरक्षित असतो. मी अनेक वैमानिकांबरोबर याबद्दल संवादही साधला आहे. पण, ते हेच म्हणालेत की, टर्ब्युलन्स म्हणजे फार काही मोठं नसून फक्त खराब रस्त्यांमुळे होणारा त्रास असतो. पण, माझ्या मेंदूला हे समजत नाहीये. त्याला हे कोण सांगणार, मला असं वाटतं की, माझं माझ्या मेंदूवर नियंत्रण पाहिजे होतं. माझ्या प्रत्येक अवयवावर नियंत्रण असायला पाहिजे होते म्हणजे मी काय करत आहे याची मला जाणीव असेल.”
दरम्यान, टायगर शेवटचा ‘बागी ४’मधून झळकलेला. त्यामध्ये अभिनेता मुख्य भूमिकेत होता. पण, त्याचा हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. ‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार ८० कोटी बजेट असलेल्या या चित्रपटानं जगभरात फक्त ७७.६७ कोटींची कमाई केली.
