Tigmanshu Dhulia on Censorship : भारतीय चित्रपटसृष्टी आणि सेन्सॉरशिप यांचं नातं नेहमीच वादग्रस्त राहिलं आहे. ‘द वायर’च्या एका कार्यक्रमात प्रसिद्ध दिग्दर्शक तिग्मांशु धुलिया यांनी चित्रपटसृष्टीतील सेन्सॉरशिपचा इतिहास मांडला. ब्रिटिश काळात भारतीय दिग्दर्शकांनी अत्यंत हुशारीने ब्रिटिशांना नकळत देशभक्तीपर संदेश चित्रपटांमधून कसे दिले, याचा खुलासा त्यांनी केला. ‘किस्मत’ चित्रपटातील ‘दूर हटो ऐ दुनिया वालों’ हे गाणं ब्रिटिशांनी जपानविरोधात समजून परवानगी दिली, पण प्रत्यक्षात ते ब्रिटिशांविरोधातच होतं. याशिवाय बलराज साहनी तुरुंगातून रोज सकाळी सेटवर येऊन ‘हलचल’चे शूटिंग करायचे आणि दिलीप कुमारांच्या ‘गंगा जमना’ चित्रपटातील ‘हे राम’ शब्दावरून झालेल्या वादात थेट जवाहरलाल नेहरूंना हस्तक्षेप करावा लागला होता, याबद्दलही त्यांनी सांगितलं.

“स्वातंत्र्यलढ्याच्या काळात आपल्या दिग्दर्शकांनी अत्यंत कलात्मकतेने चित्रपट बनवले. त्याकाळी समाज वेगळा होता,” असं धुलिया म्हणाले. यासाठी त्यांनी ज्ञान मुखर्जी दिग्दर्शित ‘चल चल रे नौजवान’ (१९४४) या चित्रपटाचं उदाहरण दिलं. या चित्रपटाचे सह-लेखक सादत हसन मंटो होते, तर संगीत गुलाम हैदर यांचे होते आणि अशोक कुमार यांनी यात काम केलं होतं. “त्या काळी कॉस्मोपॉलिटन संस्कृती असल्याने नेमकं काय चाललंय हे ब्रिटिशांना कळायचंच नाही.”

‘किस्मत’ गाण्यातील लपलेला मेसेज

तिग्मांशू यांनी १९४३ मधील अशोक कुमार यांच्या ‘किस्मत’ चित्रपटातील ‘दूर हटो ऐ दुनिया वालों, हिंदुस्थान हमारा है’ या प्रसिद्ध देशभक्तीपर गाण्याची आठवण करून दिली. “दुसरे महायुद्ध सुरू होते. जपानने पूर्वेकडून म्यानमारवर हल्ला केल्यामुळे ब्रिटिशांना वाटले की हे गाणे जपानी लोकांविरुद्ध आहे. पण, हे गाणं त्यांच्याच विरोधात असल्याचं त्यांना समजलंच नाही. अशा प्रकारे चित्रपट राजकारणाला पुढे नेत होते.”

बलराज साहनी यांचा ‘जेल ते सेट’ प्रवास

स्वातंत्र्यानंतरही चित्रपट निर्माते, सरकार आणि राजकीय मतभेद यांच्यातील संबंध गुंतागुंतीचेच होते, असं तिग्मांशू धुलिया यांनी सांगितलं. १९५० च्या दशकाच्या सुरुवातीला ‘हलचल’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेते बलराज साहनी यांना अटक झाली होती, त्यानंतरचा किस्सा त्यांनी सांगितला. ‘इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन’शी संबंधित साहनी या चित्रपटात एका जेलरची भूमिका करत होते. “बलराज साहनी भाषण देत असताना त्यांना अटक करून मुंबईतील तुरुंगात टाकण्यात आलं होतं,” असं धुलिया म्हणाले.

या अटकेमुळे शूटिंग कसं करायचं हा मोठा प्रश्न निर्माते के. आसिफ यांच्यासमोर निर्माण झाला, कारण चित्रपटाचा सेट तयार होता आणि साहनी आले नसते तर मोठं नुकसान झालं असतं. “के. आसिफ राज्यपालांकडे गेले. त्या काळातील सरकार पाहा. त्यांनी बलराज साहनींना सकाळी ९ च्या शिफ्टची परवानगी दिली. ते सकाळी तुरुंगातून बाहेर पडायचे, सेटवर जाऊन जेलरचा पोशाख घालून अभिनय करायचे आणि संध्याकाळी परत तुरुंगात जायचे. असा तो काळ होता,” असं धुलिया म्हणाले.

जेव्हा सेन्सॉर बोर्डाने ‘हे राम’ शब्दावर घेतला होता आक्षेप

दिलीप कुमार यांच्या ‘गंगा जमना’ चित्रपटाशी संबंधित वाद आणि त्यांच्या पात्राच्या तोंडी असलेल्या ‘हे राम’ या शब्दावर सेन्सॉर बोर्डाने घेतलेल्या आक्षेपाची आठवण धुलिया यांनी सांगितली. “सेन्सॉर बोर्डाने अतिशय विचित्र कारण देत चित्रपटाला परवानगी दिली नाही. ते म्हणाले, ‘तुम्ही ‘हे राम’ कसे म्हणू शकता? तुम्ही मुस्लीम आहात. निर्मात्यांनी सांगितलं की चित्रपटातील पात्राचे नाव गंगा आहे, तो हिंदू आहे, त्यामुळे तो ‘हे राम’ म्हणू शकतो, पण असा युक्तिवाद करूनही सेन्सॉर बोर्डने मंजुरी दिली नाही.”

धुलिया यांच्यामते, शेवटी हे प्रकरण तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडे गेले. त्यांनी चित्रपट पाहिला आणि त्यात काहीही अडचण नसल्याचं स्पष्ट केलं. “पण त्यानंतर एक नवीन अडचण आली. जर सेन्सॉरकडे अडकलेल्या इतर चित्रपटांनाही मंजुरी मिळाली नसती, तर लोक म्हणाले असते की दिलीप कुमार यांची पंतप्रधानांशी ओळख असल्यामुळे त्यांच्या चित्रपटाला मंजुरी मिळाली. त्यामुळे प्रशासनाला काही कारणास्तव अडकून पडलेल्या इतरही चित्रपटांना मंजुरी द्यावी लागली होती,” असं तिग्मांशू धुलिया म्हणाले.