गोविंदाची पत्नी सुनिता आहुजाने युट्यूबवर व्हिडीओ बनवणं सुरू केलंय. ताज्या व्लॉगमध्ये तिची मुलगी टीना आहुजा पाहायला मिळाली. टीनाने महिला दिनानिमित्त आपल्या आईला एक सुंदर हिऱ्याची अंगठी भेट देऊन खास सरप्राईज दिलं. याच व्हिडीओमध्ये टीनाने तिचे आई-वडील, म्हणजेच गोविंदा आणि सुनिता यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवरही प्रतिक्रिया दिली. दोघांसाठी मागची काही वर्षे चांगली गेलेली नाही, अशी कबुलीही टीनाने दिली.
व्लॉगच्या सुरुवातीला टीनाने सांगितलं की तिने तिच्या आईला सरप्राईज देण्यासाठी हा व्लॉग हायजॅक केला आहे. ती म्हणाली, “आपण स्त्रिया इतरांसाठी खूप काही करतो, पण स्वतःचा विचार करत नाही. म्हणूनच मी माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या स्त्रीसाठी काहीतरी खास करायचं ठरवलं.” टीने आईला फुलं आणि एक कार्ड गिफ्ट केलं.
गोविंदा-सुनीताच्या घटस्फोटाबद्दल मुलगी टीना म्हणाली…
व्लॉगमध्ये नंतर गोविंदा आणि सुनिता यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांचा अहवाल दाखवण्यात आला. यावर बोलताना टीना म्हणाली, “गेली दोन वर्षे आमच्यासाठी फार चांगली नव्हती. आमच्या आयुष्यात खूप चढ-उतार आले आहेत.” खरं तर काही महिन्यांपूर्वी सुनिताने गोविंदावर ‘कोमल’ नावाच्या अभिनेत्रीबरोबर अफेअर असल्याचा आरोप केला होता. मात्र, गोविंदाने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.
भाज्या निवडायला शिकली टीना आहुजा
टीनाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक खास गोष्ट शेअर केली. टीना आता दुसऱ्या शहरात राहत आहे. तिथे भाजीपाला आणि घरगुती वस्तू खरेदी करायला शिकत आहे, असं तिने सांगितलं. “यामुळे कदाचित लोक मला ट्रोल करतील, पण मी फ्लॉवर, बटाटे आणि इतर भाज्या कशा विकत घ्यायच्या हे शिकायला सुरुवात केली आहे,” असं टीना आहुजा म्हणाली.
आता मी स्वतःसाठी जगतेय – सुनीता आहुजा
टीनाने आणलेले सर्व सरप्राईज गिफ्ट आईला दिले. मुलीशी बोलताना सुनिता म्हणाली, “प्रत्येक गोष्ट एका मर्यादेतच केली पाहिजे. मी माझ्या आयुष्यातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत, पण आता मी स्वतःसाठी जगायला सुरुवात केली आहे आणि मी यापेक्षा जास्त आनंद डिझर्व्ह करते. आता मी माझे आयुष्य अगदी थाटात जगणार आहे.”
आपण स्वतःवर अवलंबून राहायला हवं – टीना आहुजा
सुनिताने आपल्या मुलांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, “यश आणि तू आता मोठे झाला आहात. आता सगळे ‘मालदार पार्टी’ (श्रीमंत) होणार आहात.” त्यावर टीनाने “कुणाची नजर न लागो” असं म्हटलं. त्यानंतर नात्यात स्वतःचे अस्तित्व जपण्याविषयी टीना म्हणाली, “आपण स्वतःवर अवलंबून राहायला हवं. दुसऱ्याच्या प्रेमात आपण स्वतःला विसरून जातो.” टीनाचं हे बोलणे ऐकून सुनिताने थेट हात जोडले.
टीनाने आईला हिऱ्याची अंगठी भेट दिली. सुनिता कौतुकाने म्हणाली, “टीना एका ज्वेलरी डिझाइन कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर झाली आहे आणि तिने दिलेलं हे गिफ्ट आहे.” त्यावर टीनाने सांगितलं की ही अंगठी त्या ब्रँडची नाही. टीनाने स्वतः पैसे कमवून ही अंगठी गिफ्ट केली, असं सुनीता आहुजा म्हणाली.
