दाक्षिणात्य अभिनेता यश सध्या त्याच्या ‘टॉक्सिक’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाला भारतासह जगभरातही चांगला प्रतिसाद मिळत असून चित्रपटाने आतापर्यंत कोट्यावधींचा गल्ला जमावला आहे. अशातच आता चौथ्या दिवशी या चित्रपटाने किती कमाई केली याबद्दल जाणून घेऊया.

यशच्या ‘टॉक्सिक’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाई सुरूच आहे. मात्र, रेकॉर्डब्रेक ओपनिंगनंतर चित्रपटाच्या कमाईत मोठी घट झाली आहे. गीतू मोहनदास दिग्दर्शित या चित्रपटाने चौथ्या दिवशी भारतात चांगली अधिक कमाई केली आहे.

चौथ्या दिवशीही केली कोट्यावधींची कमाई

सॅक्निल्कच्या वृत्तानुसार टॉक्सिकने चौथ्या दिवशी १७,६१२ शोमधून २४.५० कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलं आहे. चौथ्या दिवसाच्या कमाईनंतर ‘टॉक्सिक’च्या भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शनने २२७.५० कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. तर चित्रपटाने भारतात १९०.४५ कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलं आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर ‘टॉक्सिक’ने आतापर्यंत २५४.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘टॉक्सिक’च्या कन्नड व्हर्जनची चौथ्या दिवशी एकूण ऑक्युपन्सी ४७.२३ टक्के नोंदवण्यात आली. तर चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनची ऑक्युपन्सी २६.१९ टक्के होती. ‘टॉक्सिक’ २६ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी भारतात १०१.१० कोटी रुपयांचं नेट कलेक्शन करत विक्रमी ओपनिंग केली. मात्र, त्यानंतरच्या दिवसांत चित्रपटाच्या कमाईत लक्षणीय घट पाहायला मिळाली.

या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काही प्रेक्षकांनी यशचं काम. चित्रपटातील भव्य व्हिज्युअल्स आणि अॅक्शन सीक्वेन्सचं कौतुक केलं आहे. तर काहींनी कथालेखन, चित्रपटाचा वेग आणि लांबीवर टीका केली आहे. प्रदर्शनानंतर चित्रपटाला मिळालेल्या या संमिश्र प्रतिक्रियांमुळे ‘टॉक्सिक’ची चांगलीच चर्चा रंगली आहे. संमिश्र रिव्ह्यू आणि प्रेक्षकांच्या विभागलेल्या प्रतिक्रियांदरम्यान ‘कांतारा’चा दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टीने ‘टॉक्सिक’च्या समर्थनार्थ पोस्ट केली. एक्सवर पोस्ट करत त्याने यशच्या अभिनयाचं कौतुक केलं.

ऋषभ शेट्टीने केलं यशचं कौतुक

ऋषभ शेट्टी म्हणाला, “कलाकार जेव्हा एखादी भूमिका साकारतो, तेव्हा ती व्यक्तिरेखा जिवंत करण्यासाठी तो मनापासून प्रयत्न करतो. ‘टॉक्सिक’मध्ये एका शक्तिशाली व्यक्तीचा संघर्ष ज्या आत्मविश्वासाने मांडला आहे, त्याने तो प्रभावित झाला, असं त्याने सांगितलं. चित्रपटाची कथा आणि प्रमुख व्यक्तिरेखा नेहमीच्या धाटणीपेक्षा वेगळ्या असल्या तरी वेगळा मार्ग म्हणजे चुकीचा मार्ग असं नाही, असंही ऋषभने नमूद केलं. अशा मोठ्या पडद्यावरील व्यक्तिरेखेसाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याची तुझी पद्धत कौतुकास्पद आहे. प्रत्येक दृश्यात मला ते जाणवलं. अपराधीपणामुळे आयुष्यातील विषारीपणा कसा वाढत जातो, याचा अनुभव प्रेक्षकांना देणं सोपं नाही. हा धाडसी प्रयोग केल्यामुळे मी तुमच्या पाठीशी उभा आहे.”