सध्या हनुमान अंश व मिर्झापूर या चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर जलवा पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे या दोन चित्रपटांसमोर सुपरस्टार यशच्या ‘टॉक्सिक’ला प्रेक्षक मिळत नाहीये. कोट्यवधींचे बजेट व तगडी स्टारकास्ट असूनही यशच्या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. दुसरीकडे, अवघ्या दोन कोटींचे बजेट असलेल्या हनुमान अंशने ३२ व्या दिवशी जबरदस्त कलेक्शन केले आहे. तर मिर्झापूरचे कलेक्शन त्यापेक्षाही जास्त आहे. एकूणच या दोन्ही चित्रपटांमुळे टॉक्सिकला मोठा फटका बसला असून तो लवकरच थिएटरमधून गायब होईल असं दिसतंय.

टॉक्सिक बॉक्स ऑफिस कलेक्शन

तब्बल ५०० कोटींचे बजेट असलेला टॉक्सिक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला आहे. चित्रपटाची १३ व्या दिवसाची कमाई कोटींमध्ये नाही तर लाखांमध्ये झाली. त्या तुलनेत हनुमान अंश व मिर्झापूर दोन्हीची कमाई जास्त आहे.

१३ व्या दिवशी ‘टॉक्सिक’ चित्रपटाने १,३५४ शोजमधून भारतात फक्त ६६ लाख रुपये कमावले. यासह टॉक्सिकची भारतातील आतापर्यंतची एकूण कमाई २९४.०९ कोटी रुपये झाली आहे. परदेशात चित्रपटाने १३ व्या दिवशी फक्त १५ लाख रुपये कमावले. टॉक्सिकने आतापर्यंत परदेशात ४३.३० कोटींचे कलेक्शन केले आहे. टॉक्सिकची एकूण कमाई आता ३३७.३९ कोटी झाली आहे. टॉक्सिकमध्ये यश, नयनतारा, कियारा अडवाणी, तारा सुतारिया, हुमा कुरेशी हे कलाकार आहेत.

हनुमान अंशचे ३२ दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

विशाल चतुर्वेदीच्या हनुमान अंश चित्रपटात नीब करौरी बाबाची भूमिका शोभिनवर सत्याने साकारली आहे. या चित्रपटाने ३२ व्या दिवशी तब्बल १० कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात १५६.२० कोटी तर भारतात १३२.१३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. अवघे २ कोटी रुपये बजेट असलेल्या हनुमान अंशने टॉक्सिकला मागे टाकत थिएटर्समध्ये धुमाकूळ घातला आहे. टॉक्सिकमुळे ज्या हनुमान अंशचे शो रद्द करण्यात आले होते, त्याच चित्रपटाने आता यशच्या टॉक्सिकला थिएटर्समधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

मिर्झापूर चित्रपटाचे कलेक्शन

बॉक्स ऑफिसवर हनुमान अंश धुमाकूळ घालत असतानाच शुक्रवारी, ४ सप्टेंबरला मिर्झापूर या गाजलेल्या सीरिजवरील चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपटही जबरदस्त कामगिरी करतोय. मिर्झापूरने चौथ्या दिवशी १६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. पंकज त्रिपाठींच्या या चित्रपटाने अवघ्या ४ दिवसांत १५० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. मिर्झापूरचे एकूण कलेक्शन १५४ कोटी रुपये झाले आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदू शर्मा, रसिका दुग्गल, जितेंद्र कुमार व रवी किशन हे कलाकार आहेत.