Dilip Kumar Real Name : बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांच्या अभिनयामुळे त्यांचे नाव हे सिनेविश्वामध्ये अजरामर झाले आहे. आजही त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून प्रचंड दाद मिळते. या कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आजची तरुण पिढीही या कलाकारांचे सिनेमे आवर्जून बघत असतात. असेच एक अभिनेते, ज्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीचे ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळख निर्माण केली; त्यांच्या नैसर्गिक आणि प्रभावी अभिनयाने भारतीय सिनेमावर वेगळी छाप सोडली, ते अभिनेते म्हणजे दिलीप कुमार. ४० च्या दशकामध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारे दिलीप कुमार यांचं खरं नाव हे वेगळंच आहे. सिनेविश्वामध्ये पदार्पण करताना त्यांनी त्यांच्या नावामध्ये बदल केला होता.

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं खरं नाव हे वेगळंच होतं. त्यांनी दिलीप कुमार म्हणून सिनेविश्व गाजवलं असले तरी त्यांचं मूळ नाव हे वेगळंच होतं. दिलीप कुमार यांचं खरं नाव हे युसूफ खान होते. आजही त्यांची अत्यंत जवळची माणसं ही त्यांना युसूफ म्हणूनच ओळखतात. विशेषतः त्यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू त्यांना प्रेमाने ‘युसूफ’ या नावानेच हाक मारत होत्या. जन्मतः त्यांचं नाव युसूफ खान असलं तरी चित्रपटसृष्टीत त्यांनी कधीही या नावाचा वापर केला नाही. १९४४ मध्ये अमिया चक्रवर्ती दिग्दर्शित ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून त्यांनी ‘दिलीप कुमार’ या नावाने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आणि याच नावाने त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली.

दिलीप कुमार यांनी का लपवली खरी ओळख?

दिलीप कुमार यांनी १९७० साली बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांचं खरं नाव आणि त्यांनी सिनेविश्वामध्ये येण्यापूर्वी नाव का बदललं याचं खरं कारण सांगितलं होतं. ते म्हणाले होते की, “माझे वडील चित्रपटांमध्ये काम करण्याच्या पूर्णपणे विरोधात होते. त्यांना मी सिनेविश्वामध्ये काम केलेलं आवडलं नसतं. त्यात वडिलांचे जवळचे मित्र लाला बशेशरनाथ यांचा मुलगा पृथ्वीराज कपूर हे सिनेविश्वामध्ये काम करत होते. त्यावेळी माझे वडील लाला बशेशरनाथांना म्हणत असत, ‘तुम्ही काय करून ठेवलं आहे? तुमचा तरुण आणि धडधाकट मुलगा बघा, तो काय काम करतोय.’

पुढे ते म्हणाले, “म्हणूनच मी चित्रपटांमध्ये आलो, तेव्हा मला ते ओरडतील याची भीती वाटत होती. माझे वडील पठाण असल्यामुळे खूप तापट स्वभावाचे होते. त्यांना हे समजलं तर ते खूप रागावतील अशी मला भीती होती. मार खाण्याच्या भीतीमुळे मी ‘दिलीप कुमार’ हे नाव स्वीकारलं. त्यावेळी मला युसूफ खान, दिलीप कुमार आणि वासुदेव अशी दोन-तीन नावं सुचवण्यात आली होती. मी स्वतः सांगितलं होतं, ‘फक्त युसूफ खान हे नाव ठेवू नका, बाकी कोणतंही नाव चालेल.’ त्यानंतर दोन-तीन महिन्यांनी एका जाहिरातीत माझं नाव पाहिलं आणि तेव्हा कळलं की, आता माझं नाव ‘दिलीप कुमार’ ठेवलं गेलं आहे.”

दिलीप कुमार यांना कोणी सुचवलं होतं नाव?

दिलीप कुमार यांनी २०१४ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘द सब्स्टन्स अँड द शॅडो’ या आत्मचरित्रातही नाव बदलण्यचा उल्लेख केला होता. ‘दिलीप कुमार’ हे नाव त्यांना ज्येष्ठ अभिनेत्री आणि ‘बॉम्बे टॉकीज’च्या मालकीण देविका राणी यांनी सुचवलं होतं. त्यांनी निर्मिती केलेल्या ‘ज्वार भाटा’ चित्रपटातून दिलीप कुमार यांनी पदार्पण केले होते, त्यामुळे प्रेक्षकांना सहज लक्षात राहील आणि पडद्यावरील रोमँटिक हिरोला साजेसं नाव म्हणून देविका राणी यांनी ‘दिलीप कुमार’ हे नाव सुचवलं होतं.