scorecardresearch

१७ व्या वर्षी लग्न, अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध; तब्बल ३० वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये परतणार प्रसिद्ध अभिनेत्री

अचानक एक दिवस सोनमने बॉलिवूडला अलविदा केलं ज्यामुळे सर्वच हैराण झाले होते. त्यावेळी सोनमचं नाव अंडरवर्ल्ड डॉन अबु सलेमशी जोडलं जात होतं

१७ व्या वर्षी लग्न, अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध; तब्बल ३० वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये परतणार प्रसिद्ध अभिनेत्री
सोनमचं नाव अंडरवर्ल्ड डॉन अबु सलेमशी जोडलं जात होतं. (फोटो- सोनम खान इन्स्टाग्राम)

९० च्या दशकात बिकिनी गर्ल नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम आता पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी तयार आहे. ऋषी कपूर यांच्याबरोबर बीचवर बिकिनीमध्ये सिझलिंग लूक देत सर्वांना घायाळ करणाऱ्या सोनमने आपल्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, “मला खूप अगोदरच बॉलिवूडमध्ये परतायचं होतं पण ते काही कारणाने शक्य झालं नाही” असं सांगितलं आहे. याशिवाय तिने फारच कमी वयात बॉलिवूड सोडण्याचं कारणही स्पष्ट केलं.

‘त्रिदेव’ चित्रपटातील लोकप्रिय गाणं ‘ओए… ओए… नजर ने किया है इशारा’मध्ये झळकलेल्या सोनमने प्रेक्षकांवर आपल्या सौंदर्याची अशी काही जादू केली होती की माधुरी- संगीतासारख्या अभिनेत्रींना प्रेक्षक विसरुन गेले होते. पण अचानक एक दिवस तिने बॉलिवूडला अलविदा केलं ज्यामुळे सर्वच हैराण झाले होते. त्यावेळी सोनमचं नाव अंडरवर्ल्ड डॉन अबु सलेमशी जोडलं जात होतं. त्यामुळेच सोनम देश सोडून निघून गेल्याचं बोललं जातं.

आणखी वाचा- आधी स्वतःबद्दल भरभरून बोलली, नंतर ढसाढसा रडली, मलायकाबरोबर नेमकं काय घडलं?

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत सोनमने आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. ती म्हणाली, “मला तीन वर्षांपूर्वीच भारतात परतायचं होतं. मात्र काही कारणाने ते शक्य झालं नाही. नंतर जगभरात कोविडची साथ पसरली. त्यामुळे सर्व गोष्टी पुन्हा पूर्ववत होण्यास बराच वेळ गेला. मी नेहमीच माझ्या कुटुंबासोबत राहिले. त्यामुळे आता भूतकाळातील गोष्टी भूतकाळातच सोडून द्यायला हव्यात.”

सोनम म्हणाली, “बॉलिवूड सोडण्यामागचं खरं कारण होतं माझं लग्न. ‘त्रिदेव’चे निर्माते राजीव रायशी मी लग्न केलं. त्यावेळी माझं वय फारच कमी होतं. माझ्या पतीवर एक जीवघेणा हल्ला झाला होता. ज्यामुळे आम्ही देश सोडून लॉस एंजेलिसला गेलो. त्यानंतर आम्ही स्वित्झर्लंडला स्थायिक झालो. पण लग्नाच्या १५ वर्षांनंतर आम्ही घटस्फोट घेतला.” सोनम आणि राजीव यांचा एक मुलगा आहे. अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध असल्यानेच सोनम आणि तिच्या पतीचा घटस्फोट झाला असल्याचंही बोललं गेलं आहे.

आणखी वाचा- तीन लग्नं, घटस्फोट अन्… वैवाहिक आयुष्यातील अपयशानंतर अशी झालेली शाहिदच्या आईची अवस्था

करिअरच्या सुरुवातीच्या काळातील आठवणींना उजाळा देताना सोनम म्हणाली, “जेव्हा मी १९८८ मध्ये ‘विजय’ चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यावेळी माझ्याकडे बऱ्याच नवीन ऑफर येत गेल्या. मला काम मिळवण्यासाठी थोडाही संघर्ष करावा लागला नाही. त्यानंतर मला, ‘त्रिदेव’, ‘मिट्टी और सोना’ या चित्रपटांतून रातोरात प्रसिद्धी मिळाली. पण नंतर मी लग्न केलं. माझ्या डोक्यात त्यावेळी काय सुरू होतं हे मला माहीत नाही. मला त्यावेळी एक कुटुंब हवं होतं. त्यावेळी मी फक्त १७ वर्षांची एक अल्लड मुलगी होते.”

दरम्यान अभिनेत्री सोनम आता ५० वर्षांची आहे. तिने बॉलिवूड सोडून आता जवळपास ३० वर्षे होऊन गेली आहेत. सोनमने वयाच्या १४ व्या वर्षीच बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली होती आणि वयाच्या १७ वर्षी तिने बॉलिवूड सोडलं. अभिनेते रझा मुराद यांची पुतणी असलेल्या सोनमचं खरं नाव बख्तावर खान असं आहे. आता लवकरच ती ओटीटी प्लॅटफॉर्म किंवा वेब सीरिजमधून बॉलिवूड पदार्पण करणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 10:32 IST

संबंधित बातम्या