FDA sent notice to Shah Rukh Khan Ajay Devgn and Tiger Shroff: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण व टायगर श्रॉफ यांना पान मसाल्याची अप्रत्यक्ष जाहिरात केल्याप्रकरणी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. महाराष्ट्रात पान मसाल्याची निर्मिती करणे, साठवणे तसेच वाहतूक, वितरण आणि विक्रीवर बंदी आहे. २०२४ मध्ये तिन्ही कलाकार पान मसाला कंपनीच्या ‘विमल इलायची’च्या जाहिरातीत ते एकत्र दिसले होते.

FDAची अजय देवगण, शाहरुख खान टायगर श्रॉफला नऊ पानांची नोटीस

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील FDA ने तीनही कलाकारांना नऊ पानांची नोटीस बजावली आहे. त्यांनी तातडीने ‘विमल इलायची’ची जाहिरात करणे बंद करावे, तसेच, त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून या जाहिरातीशी संबंधित सर्व प्रमोशनल कंटेंट हटवण्याचे निर्देश दिले आहेत. ११ ऑगस्टला ही नोटीस बजावली असून १५ दिवसांत कलाकारांना उत्तर देण्यास सांगितले आहे.

“जाहिरातीचे परीक्षण केल्यानंतर असे लक्षात येते की, या जाहिरातीद्वारे विमल ब्रँडचा प्रचार केला जात आहे. हा ब्रँड प्रामुख्याने पान मसाल्याशी संबंधित आहे. महाराष्ट्रात पान मसाल्याचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री करण्यास बंदी आहे. तसेच जाहिरातीमध्ये वापरण्यात आलेल्या ‘विमल इलायची’ या नावामुळे ग्राहकांच्या मनात त्याचा ‘विमल पान मसाला ब्रँडशी संबंध असल्याची शक्यता आहे”, असे FDAने नोटिशीत लिहिले आहे.

FDAच्या म्हणण्यानुसार, ही जाहिरात ग्राहकांची दिशाभूल करू शकते आणि बंदी असलेल्या उत्पादनाच्या ब्रँडला प्रोत्साहन मिळू शकते. विमल हे नाव इलायची किंवा इतर उत्पादनासाठी वापरून पान मसाला किंवा तंबाखूजन्य उत्पादनाशी संबंधित ब्रँडची ओळख कायम ठेवण्याचा, ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असू शकतो. ही केवळ एका उत्पादनाची जाहिरात न राहता, बंदी असलेल्या उत्पादनांची अप्रत्यक्ष जाहिरात ठरू शकते. सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराष्ट्रात पान मसाल्याच्या उत्पादन, साठवणूक, वितरण व विक्रीवर राज्यभर कडक बंदी घालणाऱ्या आदेशाचा उल्लेख करीत FDAने हा आक्षेप नोंदवला आहे.

गुटखा आणि इतर बंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन आणि विक्रीविरोधात कारवाई करणाऱ्या तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील FDA ने तिन्ही कलाकारांकडून त्यांच्या एंडोर्समेंट करारांच्या संपूर्ण प्रती, जाहिरातीची माहिती, पेमेंटशी संबंधित माहिती आणि जाहिरातीआधीच्या ‘ड्यू डिलिजन्स'(due diligence)चा पुरावा मागितला आहे.

ग्राहक संरक्षण कायद्यांनुसार, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीसाठी १० ते ५० लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच संबंधित कलाकारांना तीन वर्षांपर्यंत कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करण्यास बंदी घातली जाऊ शकते.