Tumbbad 2 Alia Bhatt Entry : ‘तुंबाड’ या सिनेमाने प्रेक्षकांना थक्क केले होते. सिनेमाची जबरदस्त कथा अन् अंगावर काटा आणणारे चित्रण यांमुळे ‘तुंबाड’ सिनेमा एक लोकप्रिय सिनेमा ठरला. यानंतर आता सिनेमाचा सिक्वेल येणार असून ‘तुंबाड २’मध्ये आलिया भट्ट झळकणार आहे. या सिनेमाची जबरदस्त चर्चा सुरू असून सिनेमात आलिया भट्टची एंट्री कशी झाली, याचा खुलासा अभिनेता आणि निर्माता सोहम शाहने केला आहे.
‘व्हरायटी इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सोहम शाहने आलिया भट्टसह काम करण्याचा अनुभव अनुभव शेअर केला. तो म्हणाला, “आम्ही आलिया भट्टला चित्रपटाची कथा ऐकवली आणि त्यानंतर तिने पटकथा वाचली. तिने लगेच होकार दिला. तिला पटकथा खूप आवडली होती, त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया खूप सोपी झाली. ती खूप प्रामाणिक आणि व्यावसायिक आहे. तिच्याबरोबरचा संपूर्ण अनुभव खूपच चांगला होता.”
आलिया खूप हुशार आहे – सोहम शाह
आलियाच्या अभिनयाबरोबरच तिच्या व्यावसायिक दृष्टिकोनाचेही सोहमने कौतुक केले. तो म्हणाला, “ती खूप हुशार आहे. ती जितकी चांगली अभिनेत्री आहे, तितकीच तिची व्यावसायिक समजही चांगली आहे. आम्ही तिला भेटायला गेलो, तेव्हा तिने काही महत्त्वाचे प्रश्न विचारले. तिने आमच्याकडून चित्रपटाची कथा ऐकली आणि दोन-तीन दिवसांत पटकथा वाचली. त्यानंतर आमची पुन्हा भेट झाली. फक्त दोन भेटींमध्ये आलिया भट्ट ‘तुंबाड २’ सिनेमा करणार असल्याचे ठरले.”
एखाद्या कलाकाराने इतक्या कमी वेळात चित्रपटासाठी होकार देणे हे सहसा घडत नाही, असेही सोहमने सांगितले. तो म्हणाला, “एखाद्या भूमिकेसाठी कलाकारांनी इतक्या सहज आणि लवकर होकार देणे, असे फार क्वचित घडते आणि ते खूप अवघडही आहे. पण आलियाला पटकथेतील दमदारपणा आणि तिच्या भूमिकेचे महत्त्व समजले. या कथेत काय आहे आणि काय नाही, हे तिला लक्षात आले. त्यामुळे ती खरोखरच खूप हुशार आहे.”
पुढे सोहमने सांगितले की, आलियाने यापूर्वी प्रदर्शित झालेला ‘तुंबाड’ हा चित्रपट पाहिला होता आणि तो तिला आवडलाही होता.
‘तुंबाड २’मध्ये आलिया नेमकी कोणती भूमिका साकारणार, याबाबत निर्मात्यांनी अजून खुलासा केलेला नाही. पण तिची भूमिका ही तुंबाडच्या सिक्वेलमध्ये महत्त्वाची असल्याचे सोहमने स्पष्ट केले. तो म्हणाला, “आलिया या चित्रपटात आहे आणि तिच्या पात्राचे कथेत मोठे योगदान आहे. तिची निवड अगदी योग्य आहे. प्रेक्षक जेव्हा चित्रपट पाहतील, तेव्हा तिची निवड इतकी योग्य का आहे, हे त्यांच्या लक्षात येईल.”
