Alia Bhatt in Tumbbad 2 : आलिया भट्ट बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम करत तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. येत्या काळात ती ‘लव्ह अँड वॉर’ आणि ‘अल्फा’ या दोन चित्रपटांतून झळकणार आहे, पण अशातच आता आलिया अजून एका बहुप्रतीक्षित चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे.

आलिया भट्टच्या अभिनयाचं आतापर्यंत अनेकांनी कौतुक केलं आहे. तिच्या प्रत्येक भूमिकेला चाहत्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो. अशातच आता अभिनेत्री एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येण्याची शक्यता आहे. ही बातमी खरी असेल तर आलियाला अशा थ्रिलर चित्रपटातून पाहणं तिच्या चाहत्यांसाठी सुखद धक्का असेल. 

आलिया भट्टचं नाव ‘तुंबाड २’ चित्रपटाशी जोडलं जात आहे. अभिनेत्री या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये झळकणार असल्याची चर्चा सुरू आहे. ‘एबीपी’च्या वृत्तानुसार  सोहम शाह हे गेल्या काही काळापासून त्यांच्या आगामी ‘तुंबाड २’ (Tumbbad 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या हॉरर चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. २०१८ मध्ये आलेल्या ‘तुंबाड’ या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये आता बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची एंट्री झाली आहे.

‘तुंबाड २’ मध्ये आलिया भट्ट कॅमिओ करणार

या चित्रपटासाठी मेकर्सना मोठ्या फीमेल स्टारची गरज होती आणि आता आलिया भट्टच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यचं म्हटलं जातंय. ‘मिड-डे’च्या रिपोर्टनुसार, ती या चित्रपटात दमदार कॅमिओ करणार आहे. जरी तिचा स्क्रीन टाइम कमी असला तरी कथेत तिची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, “मेकर्सना असा कलाकार हवा होता, जो कमी वेळातही आपल्या उपस्थितीने प्रभाव आणि रहस्य निर्माण करू शकेल. या भूमिकेसाठी आलिया भट्ट अगदी योग्य आहे.”

उल्लेख केलेल्या माध्यमाच्या माहितीनुसार ४ मे रोजी ‘मेट गाला’साठी अमेरिकेला जाण्यापूर्वी ३ मे रोजी तिने या चित्रपटाचं शूटिंग केलं आहे. शूटिंगची योजना खूप नीट आखली गेली असून यासाठी मुंबईतील मढ आयलंडमध्ये भव्य सेट तयार करण्यात आला आहे. 

अलीकडेच ‘तुंबाड २’ ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट ३ डिसेंबर २०२७ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘तुंबाड’ हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि हळूहळू या चित्रपटाने अनेकांची पसंती मिळवली. २०२४ मध्ये तो पुन्हा थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.