Tumbbad 2 Official Release Date: भारतीय सिनेमात लोककथांवर आधारित हॉरर चित्रपटांचा नवा ट्रेंड सुरू करणाऱ्या ‘तुंबाड’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता निर्मात्यांनी अधिकृतपणे ‘तुंबाड २’ (Tumbbad 2) ३ डिसेंबर २०२७ रोजी रिलीज होणार असल्याची घोषणा केली आहे. २०२४ मध्ये ‘तुंबाड’ पुन्हा प्रदर्शित झाल्यावर मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे या सिक्वेलची चर्चा जोरात सुरू होती. अभिनेता सोहम शाह आणि दिग्दर्शक आदेश प्रसाद यांनी या सिक्वेलमध्ये पौराणिक कथा आणि थरार यांचा अधिक सखोल आणि भव्य अनुभव देण्याचे आश्वासन दिले आहे.
‘तुंबाड’मुळे सोहम शाह यांनी भारतीय सिनेमात लोककथांवर आधारित हॉरर चित्रपटांसाठी एक वेगळी ओळख निर्माण केली होती आणि गेल्या काही वर्षांत या चित्रपटाची लोकप्रियता सतत वाढतच गेली आहे. आता ‘तुंबाड २’द्वारे निर्माते आता आणखी थरारक अनुभव प्रेक्षकांना देण्यासाठी सज्ज आहेत.
तुंबाड २ बद्दल सोहम शाह म्हणाला…
सिक्वेलबद्दल बोलताना सोहम शाह म्हणाला, “’तुंबाड’ माझ्यासाठी नेहमीच खास राहिला आहे आणि ‘तुंबाड २’द्वारे आम्ही त्या दुनियेला अधिक सखोल आणि विस्तृत स्वरूपात पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही त्याच पौराणिक कथा आणि वातावरणाला अधिक भव्य रूप देत आहोत, ज्याच्याशी प्रेक्षक जोडले गेले होते, तसेच कथेत नवीन गोष्टीही उलगडत आहोत. यात काही गोष्टी ओळखीच्या वाटतील, पण त्याची मांडणी पूर्णपणे नवीन असेल.”

प्रेक्षकांना जादुई अनुभव देणार- दिग्दर्शक
दिग्दर्शक आदेश प्रसाद म्हणाले, “ही कथा पुढे नेणं रोमांचक आणि आव्हानात्मक दोन्ही होतं, विशेषतः कारण पहिल्या चित्रपटाची एक मजबूत ओळख आहे. आम्ही त्याची आत्मा जपण्यावर भर दिला आहे, तसेच कथा आणि व्हिज्युअलला अधिक पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही असे काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत जे आपल्या मुळांशी जोडलेले असेल, पण प्रेक्षकांना एक नवीन आणि जादुई अनुभवही देईल.”
‘तुंबाड २’चे दिग्दर्शन आदेश प्रसाद करत आहेत आणि या चित्रपटाी निर्मिती अभिनेता-निर्माता सोहम शाह त्यांच्या ‘सोहम शाह फिल्म्स’ या बॅनरखाली करत आहे. तसेच डॉ. जयंतीलाल गडा यांची कंपनी ‘पेन स्टुडिओज’ देखील याची निर्मिती करत आहे. त्यांनी ‘RRR’ आणि ‘गंगूबाई काठियावाडी’सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसह ३००० हून अधिक चित्रपटांवर काम केले आहे.
