Jeetendra And Tusshar Kapoor Sell Mumbai Building: अभिनेते जितेंद्र कपूर आणि त्यांच्या कुटुंबियांनी ८ महिन्यांपूर्वी मुंबईतील अंधेरी येथील स्वतःची एक जमीन तब्बल ८५५ कोटींना विकली होती. २९ मे २०२५ रोजी जमीन विक्रीबाबत करार झाला होता. त्यानंतर आता त्यांनी आणखी एक इमारत विकली आहे. तब्बल ५५९ कोटींमध्ये हा व्यवहार झाला आहे. आठ महिन्यांत जितेंद्र कपूर व कुटुंबाने १,४१४ कोटींची मालमत्ता विकली आहे.
एका सेलिब्रिटी डीलने पुन्हा एकदा मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटचे लक्ष वेधून घेतले आहे. ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि त्यांचा मुलगा तुषार कपूर यांनी ५५९.२५ कोटींना एक इमारत जापानी फर्मला विकली आहे. ही डील अलिकडच्या काळात सेलिब्रिटींशी संबंधित सर्वात महागडी डील आहे. या डीलबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
विक्री झालेली मालमत्ता कुठे आहे?
ही मालमत्ता मुंबईतील चांदिवली भागातील बालाजी आयटी पार्कची DC-10 ही इमारत आहे. ही पवईजवळीक एक बिझनेस हब बिल्डिंग आहे. प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनच्या रेकॉर्ड्सनुसार, जानेवारी २०२६ मध्ये या कराराची नोंदणी करण्यता आली. इमारतीचे एकूण बांधकाम क्षेत्रफळ सुमारे ३०,१९५ चौरस मीटर आहे म्हणजेच अंदाजे ३.२५ लाख चौरस फूट आहे. त्यामुळे ही इमारत एक मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसएवढी होती.
कोणत्या कंपनीच्या नावावर होती इमारत?
ही व्यावसायिक मालमत्ता तुषार कपूरची कंपनी, तुषार इन्फ्रा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि जितेंद्र यांची कंपनी, पॅन्थियन बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या नावावर रजिस्टर्ड होती. गेल्या काही वर्षांत चांदिवली आणि पवई भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. इथे व्यावसायिक आणि निवासी इमारतींचं प्रमाण वाढतंय. आयटी पार्क, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि चांगल्या कनेक्टिव्हिटीमुळे या भागातील मालमत्तेच्या किमती सातत्याने वाढत आहेत. याचदरम्यान तुषार व जितेंद्र यांनी ही मालमत्ता चांगला नफा कमवून विकली आहे.
जितेंद्र हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार होते. अनेक वर्षे त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. नंतर, त्यांनी मुलगी एकता कपूरबरोबर बालाजी टेलिफिल्म्सची स्थापना केली. याअंतर्गत त्यांनी अनेक मालिकांची निर्मिती केली. तर तुषार कपूरने अनेक बॉलीवूड चित्रपट केले. त्याचबरोबर जितेंद्र यांनी मुलांच्या नावे रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती.
