बॉलीवूडचे कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी ते त्यांच्या चित्रपटातील भूमिकांमुळे, कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे, तर कधी त्यांच्या वक्तव्यामुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता अभिनेता तुषार कपूरने काही लोक मी यशस्वी होताना पाहू शकत नाही, असे विधान केल्याने मोठ्या चर्चेत आहे. काय म्हणाला तुषार कपूर? अभिनेता तुषार कपूरने 'दस जून की रात' या चित्रपटाद्वारे ओटीटी विश्वात पदार्पण केले आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, 'इंडिया टुडे'शी बोलताना त्याने करिअरबद्दल वक्तव्य केले आहे. त्याने म्हटले, "कधीकधी मला वाटते की, चित्रपटसृष्टीत असा एक भाग आहे, जो मला कधीच स्वीकारू शकला नाही आणि हा समुदाय सतत तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतो, हे दु:खद असले तरी खरे आहे. पण, आता या सगळ्यातून मार्ग काढत मी मोठा झालो आहे. हेही वाचा: अभिनय सोडून मंत्र्याच्या मुलाशी बांधली लग्नगाठ; अभिनेत्रीने पहिल्यांदाच शेअर केले लाडक्या लेकीचे Photos सुदैवाने माझा चाहतावर्ग कायम माझ्याबरोबर असतो. मी काय केले किंवा नाही केले याने त्यांना काहीही फरक पडत नाही. ज्यांना अभिनयाचा वारसा असतो, त्यांना मिळणाऱ्या फायद्याबद्दल लोक कायम बोलत राहतात. मला जे करायचे होते, माझ्या वाट्याला जे आले ते मी केले. पण, मी अनेक तोटेही सहन केले आहेत. एक नवीन विद्यार्थी होऊन वेळोवेळी अनेक गोष्टी शिकल्या. अनेक गोष्टींशी संघर्ष करण्यामुळे मला कायम वास्तविकतेमध्ये स्वत:ला ठेवण्यास मदत झाली." पुढे बोलताना अभिनेत्याने म्हटले आहे, "मला मुलगा आहे, ज्याच्यामुळे मला तणावमुक्त वाटते, कोणत्याही गोष्टीचा ताण वाटत नाही. त्यामुळे मी आयुष्यावर लक्ष केंद्रित करू शकतो आणि सकारात्मक असतो. याबरोबरच, शारीरिक तंदुरुस्ती आणि बौद्ध धर्म मला समजूतदार ठेवण्यास मदत करतात. या सगळ्यामुळे माझे आयुष्य उत्तम चालू आहे. माझा विश्वास आहे की, अंधारानंतर प्रकाश दिसतो. चढ-उतार आयुष्यात नसतील, तर आयुष्य कंटाळवाणे होईल. दरम्यान, तुषार कपूरची मुख्य भूमिका असलेला 'दस जून की रात' हा चित्रपट ४ ऑगस्टला जिओ सिनेमावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तुषार कपूरबरोबर प्रियांका चहर चौधरी मुख्य भूमकेत दिसणार आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का?हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.