Twinkle Khanna Advised Akshay Kumar: अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना ही सेलिब्रिटी जोडी बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. अक्षय कुमार हा विविध चित्रपट आणि त्यातील त्याच्या भूमिकांमुळे चर्चेत असतो.

ट्विंकल खन्ना ही सध्या काजोलबरोबर ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरही सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टी, तिची मतं, घटना शेअर करीत असते.

ट्विंकल तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. त्याबरोबरच अभिनेत्री ती लेखिकादेखील आहे. तिने टाइम्स ऑफ इंडियामध्ये कॉलममध्ये एक किस्सा लिहिला होता. तो नेमका काय हे जाणून घेऊ…

“तर वचन देते की…”

त्यामध्ये ट्विंकल खन्नाने कॉलममध्ये एका सुटीचा तपशील देताना लिहिले होते की, ती आणि अक्षय कुमार कॅम्पमध्ये परतत होते. त्यावेळी त्यांच्या गाईडने टिक-टिक या पक्ष्यांच्या प्रजातीविषयी सांगितले. या पक्ष्यांची जोडपी एकमेकांप्रति समर्पित असतात. जर या जोडीपैकी एक पक्षी आधी मेला, तर त्याचा जोडीदार विषारी गवत खाऊन स्वत:ला मारून घेतो.

गाईडने या पक्ष्यांबद्दल ही माहिती दिल्यावर ट्विंकलने लगेच अक्षय कुमारला सांगितले की, जर माझे तुझ्याआधी निधन झाले, तर विषारी गवत खाणे तुझ्यासाठी चांगले आहे. जर तुझी दुसरी बायको माझ्या हँडबॅग्स घेऊन फिरताना दिसली, तर वचन देते की, मी येईन आणि तुमच्या दोघांचा छळ करीन. हे ऐकताच अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाची मस्करी करण्याची संधी सोडली नाही. तो म्हणाला, हे सगळं ऐकण्यापेक्षा ते विषारी गवत लगेच खाऊन घेतो म्हणजे असे सल्ले ऐकण्याची वेळ येणार नाही. असा मजेशीर किस्सा ट्विंकल खन्नाने आपल्या कॉलममध्ये लिहिला.

टू मच विथ काजोल अँड ट्विंकल या शोबाबत बोलायचे, तर या शोमध्ये बॉलीवूडमधील लोकप्रिय कलाकारांनी आतापर्यंत हजेरी लावली आहे. त्यामध्ये सलमान खान आणि आमिर खान, अक्षय कुमार आणि सैफ अली खान, आलिया भट्ट आणि वरुण धवन अशा अनेक कलाकारांनी या शोमध्ये हजेरी लावली आहे. कलाकार त्यांच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील विविध गोष्टी शेअर करताना दिसतात. ते अनेक गमतीजमती आणि किस्सेदेखील सांगतात.

अक्षय कुमारच्या कामाबाबत बोलायचे, तर तो नुकताच अर्शद वारसीबरोबर जॉली एलएलबी ३ या चित्रपटात दिसला होता. लवकरच तो वेलकम टू द जंगल या चित्रपटात दिसणार आहे.